मुंबई : हॅंड ब्रेक, क्लच अन् स्टेअरिंग हाताळताना चालकांनी दक्षता घ्यावी. शहरातील रस्त्यांवर बेस्ट बसचा स्पीड मर्यादितच ठेवा. आगारातून बाहेर पडताना बसची योग्य तपासणी करून द्यावी, तसेच रस्त्यांवर दुचाकी जात असेल तर ओव्हरटेक करू नका, अशा प्रकारचे समुपदेशन सध्या बेस्टमधील चालकांचे करण्यात येत आहे. दादर येथील अपघातानंतर उपक्रमाने चालकांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
कुर्ला, भांडुप, दादर, कांदिवली येथे बेस्ट बसचे अपघात झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सगळे अपघात भाडेतत्त्वावरील बसचे झाले असून भाडेतत्त्वावरील बसच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेस्टचे सद्यस्थितीत २५ लाख प्रवासी आहेत. सुरक्षित व सर्वांत स्वस्त प्रवास म्हणून मुंबईकर बेस्टने प्रवास करतात. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात
मालकीच्या व भाडेतत्त्वावरील वातानुकूलित विद्युत व विनावातानुकूलित अशा २,७०० बस आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट बसच्या विशेष करून भाडेतत्त्वावरील बसच्या अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भांडुप, कुर्ला आणि दादर येथील बसच्या अपघातानंतर उपक्रमाने चालकांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी व स्वमालकिच्या बसवर सुमारे सात हजार चालक कार्यरत असून त्यांना दिंडोशी येथे महिनाभर प्रशिक्षण दिले जाते. अपघात टाळण्यासाठी काय करावे याबाबत समुपदेशन केले जात आहे. बेस्ट बस तीन पाळ्यांमध्ये चालवल्या जातात, एका बसवर तीन चालक सेवा देतात. प्रती तास ६० किमी वेगमर्यादा असून सात हजार चालकांचे अपघात टाळण्यासाठी समुपदेशन केले जात आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
