मुंबई : राज्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी महायुतीमध्ये (भाजप आणि शिंदेची शिवसेना) वाद निर्माण झाला आहे. या निवडणुकीतील काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षेनुसार सहकार्य केले नसल्याची नाराजी आणि आरोप भाजपाने केला आहे. त्यावर तुम्हालाच सर्व जागा हव्यात का असा सवाल केला आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेत श्रेयावरुन कुरघोडी सुरु असताना असाच काहीसा प्रकार मुंबईच्या बेस्ट उपक्रमात देखील सुरु झाला आहे. कर्मचाऱ्यांना आमच्याच प्रयत्नांमुळे बोनस मिळाला हे दाखविण्यासाठी भाजपा आणि शिंदे सेनेत चढा-ओढ सुरु आहे.

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी बेस्टमधील सर्वच कामगार संघटनांनी केली होती. या मागणीवर बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा देखील झाली होती.नियमानुसार, बेस्टचा दिवाळी बोनस हा बेस्ट समिती अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक यांच्याकडून संयुक्तपणे जाहीर केला जातो. मात्र, शुक्रवारी भाजप नेते प्रसाद लाड यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापिका सोनिया सेठी यांची भेट घेतली आणि बेस्ट भवनात आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःच बोनस जाहीर केला.या प्रकारावर बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बेस्ट प्रशासनाकडून बोनसची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे बेस्टमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर बेस्ट कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३, हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१,००० रुपयांचा बोनस देण्यात आला होता.बेस्ट प्रशासनाने यापूर्वी २२,००० कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बोनस देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु सध्या अंतिम आकडा आणि महापालिकेच्या आर्थिक मदतीबाबत चर्चा सुरू असून अंतिम घोषणा बेस्टच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता करणार आहेत. दरम्यान भाजपा नेते प्रसाद लाड यांनी बोनसबाबत केलेल्या घोषणेने शिंदे गटात नाराजी पसरली आहे.