मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या परिवहन आणि विद्युत विभागाची दिवसेंदिवस अवस्था बिकट होत असून सेवानिवृत्त कामगारांची देणीही मिळत नसल्यामुळे आता बेस्टचे आजी-माजी कामगार हतबल झाले आहेत. महायुती सत्तेवर आल्यावर बेस्टच्या सगळ्या समस्या सुटतील, अशी अपेक्षा कामगारांना होती. मात्र महायुतीचे लोकप्रतिनिधी देखील बेस्टचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरले असल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व कामगार संघटनांनी पक्ष आणि मतभेद बाजूला ठेवून दादर येथे सोमवारी पार पडलेल्या बैठकीत एकत्र येण्याचे ठरवले.
गेल्या काही वर्षात बेस्ट उपक्रमाची दूरवस्था झाली असून संचित तूटही वाढत चालली आहे. परिवहन विभागात बेस्टच्या गाड्यांचा ताफा कमी होत असल्यामुळे सेवेवर परिणाम झाला आहे. तर एकेकाळी नफ्यात असलेला विद्युत विभागही तोट्यात गेला असून या विभागाच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे सेवा देणे हे उपक्रमाच्या हाताबाहेर गेले आहे. सेवानिवृत्त कामगारांची देणीही थकली आहेत. न्यायालयाने आदेश देऊनही ही देणी अद्याप उपक्रमाने दिलेली नाहीत.
बेस्टच्या या दूरावस्थेबाबत अनेकदा शिवसेना (ठाकरे) पक्षाची सत्ता जबाबदार असल्याचे आरोप विरोधकांनी केले. यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीची सत्ता आल्यामुळे बेस्टला चांगले दिवस येतील, अशी आशा कामगारांमध्ये निर्माण झाली होती. मात्र गेल्या तीन महिन्यात बेस्टचे कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत, कामगारांची देणीही दिलेली नाहीत. त्यामुळे बेस्टमधील सर्वच आजी-माजी कामगार हतबल झाले आहेत. या सगळ्या कामगार संघटनांनी आता एकत्र येण्याचे ठरवले असून समाजमाध्यमांवरून तसे आवाहन केले आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व कामगार संघटनांनी सोमवारी (१ जून) दादर येथे एकत्र येऊन पुढील दिशा ठरवण्याबाबत चर्चा केली.
बेस्टच्या वाहतूक विभागात स्वमालकीच्या फक्त २४९ बस शिल्लक आहेत आणि खासगी बसला आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत, अपघात होत आहेत, बस रस्त्यात बंद पडत आहेत. बेस्टची सर्व वाहतूक सर्व खासगी कंपनीचे कर्मचारीच पाहत आहेत आणि त्यावर देखील कुणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे, बेस्टचा अभियांत्रिकी विभागाला देखील काहीही काम शिल्लक राहिले नाही. एका बाजूला सेवानिवृत्तीला आलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली जात आहे. तर दुसरीकडे अन्य रिक्त पदे मात्र भरली जात नाहीत. त्यामुळे परिवहन आणि विद्युत सेवेवरही परिणाम झाला आहे. परिणामी, बेस्ट भविष्यात टिकेल की त्याचीही स्थिती कापड गिरण्यांप्रमाणे होईल आणि बेस्ट कामगारांचे हाल मिल कामगारांप्रमाणे होतील, अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनात घर करू लागली आहे. याच कारणांस्तव कामगारांनी आता एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
आता भीक नको, हक्क हवा
सर्व कामगार संघटनांनी आपापले झेंडे, बावटे, पक्ष बाजूला ठेवून संघठित होऊ या…आता वेळ आली आहे बेस्ट कामगारांची ताकद दाखवण्याची….कोण मोठा, कोण छोटा याचा विचार नंतर करू या, असे निनावी आवाहन समाजमाध्यमांवरून करण्यात आले होते. तसेच १ जून रोजी एकत्र जमण्याचे आवाहनही करण्यात आले होते. आपण सगळेच एकत्रित येऊन आजी आणि माजी बेस्ट कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र जे काही प्रयत्न केले ते पुरेसे नाहीत हे स्पष्ट होत आहे. महानगरपालिकेतील सध्याचे लोकप्रतिनिधी देखील आपले विषय हाताळण्यात अयशस्वी ठरत आहेत, असा मजकूर समाजमाध्यमांवर कामगारांना पाठवण्यात आला आहे.
