मुंबई : मुंबईकरांसह पर्यटकांच्या पसंतीच्या बेस्टच्या विद्युत डबल डेकरचा ताफा वाढणार आहे. तांत्रिक आणि कराराशी संबंधित समस्यांमुळे तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेला १५० विद्युत डबल-डेकर बसचा पुरवठा आता पुन्हा सुरू होणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. दरम्यान, वारंवार नोटिसा देऊनही कंत्राटदार बस पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने कंत्राट रद्द करण्याचा इशारा बेस्टने दिला होता. मात्र आता लवकरच ‘बेस्ट’च्या ताफ्यात १५० ई-डबलडेकर बस दाखल होणार आहेत.

बेस्टने अडीच वर्षांपूर्वी आरामदायी प्रवासासाठी २०० विद्युत डबलडेकर बसची ऑर्डर दिली होती. मात्र, आतापर्यंत त्यातील केवळ ५० गाड्या उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या. तर उरलेल्या १५० बसचा पुरवठा झालाच नाही. त्यामुळे उपक्रमाने कंत्राटदाराला नोटीसा बजावल्या. मात्र ताफा काही वाढला नाही. बसच्या पुरवठ्यात बराच विलंब होत असल्याने बेस्टला प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गावर बस पुरविण्यात अडचणी येत आहेत. बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना बससाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते.

सुधारित प्रस्ताव समितीसमोर मांडणार

सध्या बससाठी प्रतीक्षा कालावधी ५० मिनिटांवर पोहोचला आहे. बसचा पुरवठा व्हावा यासाठी कंपनीला वारंवार मुदत देण्यात आली. १५० विद्युत डबलडेकर बसचा पुरवठा कराराच्या अटींशी संबंधित एका तांत्रिक समस्येमुळे थांबला होता. हे प्रकरण ॲटर्नी जनरल यांच्याकडे सोपवण्यात आले होते. एका तांत्रिक समितीने कराराच्या अटींची तपासणी केली. त्यानंतर समितीने केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार किंमतीतील किरकोळ बदलास मंजुरी देण्याची शिफारस केली. आता बेस्ट प्रशासनाने सुधारित प्रस्ताव बेस्ट समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्याची योजना आखल्याचे बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले.

सुट्या भागांची किंमत वाढल्याने पुरवठ्यावर परिणाम

”बेस्ट”ने २०० विद्युत डबल डेकर बससाठी स्वीच मोबॅलिटी कंपनीसोबत करार केला होता. मात्र, केंद्र सरकारने २०१९ साली सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांसाठी, विशेषतः डबल डेकर बससाठी इलेक्ट्रॉनिक व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल युनिट बसविणे बंधनकारक केले. डबलडेकर बसच्या सुरक्षिततेसाठी हे युनिट उपयुक्त आहे. वाहने वळण घेताना, वाहनाच्या इंजिनला नियंत्रित करत असल्याने ते महत्त्वाचे आहे. मात्र, या उपकरणाची किंमत अधिक असल्याने आणि बसच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या किंमती वाढल्यामुळे स्वीच मोबॅलिटीकडून उपक्रमाला गाड्यांचा पुरवठा झालेला नाही.