मुंबई : मुंबईकरांची दुसर्या क्रमाकांची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाला गेल्या काही वर्षांत उतरती कळा लागली आहे. बेस्टच्या ताफ्यात १० वर्षांपूर्वी स्वमालकीच्या चार हजार बस होत्या. आता ताफ्यात एकूण २ हजार ८२९ बस असून त्यात स्वमालकीच्या फक्त २४९ बस शिल्लक आहेत. त्यामुळे ‘बेस्ट’ आता भाडेतत्त्वावरील बसवर अवलंबून आहे.
अपुर्या बसची संख्या, त्यामुळे बस थांब्यावर लागणार्या रांगा, वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी कंटाळले आहेत. त्याचा फटका बेस्ट उपक्रमाला बसत आहे. बेस्टची प्रवासी संख्या २०१६ मध्ये २७ ते २८ लाखांच्या घरात होती. आता प्रवासी संख्या १८ लाखांवर आली आहे. प्रवासी घटल्याने साहजिकच त्याचा परिणाम महसुलावरही होत आहे. बेस्टच्या ताफ्यात २०१५-१६ मध्ये ३ हजार ९६३ बस होत्या. त्यावेळी भाडेतत्त्वावरील बस ही संकल्पनाच बेस्ट उपक्रमात नव्हती. २०१५-१६ मध्ये प्रत्येक बसमागे सरासरी ८३७ प्रवासी प्रवास करत होते, तर प्रतिदिन प्रतिबस १० हजार ७५३ रुपये उत्पन्न होते. २०२५ – २६ मध्ये प्रतिबस प्रवासी संख्या ७५७ वर आली असून प्रतिबस उत्पन्नही ९ हजार ३६३ रुपयांपर्यंत खाली आले आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढती वाहतूक कोंडी, मेट्रो व अन्य सार्वजनिक वाहतूक पर्यायांची उपलब्धता, मार्गांमध्ये झालेले बदल, तसेच स्वमालकीच्या बसची झालेली घट यामुळे बेस्टच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे.

महसूलही कमी
२०१६ मध्ये दररोज सुमारे २७.५३ लाख प्रवासी होते. त्यातून सुमारे ३.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र जून २०२६ पर्यंत दररोजच्या प्रवाशांची संख्या १८.३६ लाखांवर आली असून, दैनंदिन उत्पन्नही २.३२ कोटी रुपयांवर घसरले आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत बेस्टच्या दररोजच्या प्रवासी संख्येत सुमारे ९.१७ लाखांची घट, म्हणजे जवळपास ३३ टक्के घट झाली आहे.
