मुंबई : अपुऱ्या बस संख्येमुळे बेस्ट उपक्रमाची बसमार्ग सुरू ठेवण्यात दमछाक होत आहे. गेल्या पाच वर्षांत १०० पेक्षा जास्त बसमार्ग बंद झाल्याने मुंबईकरांना बस प्रवासाकरिता ४५ मिनिटांपेक्षा जास्त प्रतिक्षा करावी लागत आहे. सध्या सुमारे ४०० बसमार्ग कार्यान्वित आहेत.

सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून प्रवासी आजही बेस्टला पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाची आर्थिक घडी पुर्णपणे विस्कटलेली आहे. १० वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात ५ हजार बस होत्या.त्यातून दिवसाला सुमारे ५५ लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र हाच आकडा घसरला असून सद्यस्थितीत केवळ २ हजार ७६७ बस आहेत.त्यातून सुमारे २३ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.ताफ्यातील एकूण बसपैकी फक्त २४९ बस स्वमालकीच्या तर उर्वरित २ हजार ५१८ बस भाडेतत्वावरील आहेत.

तरुणांचा एक ग्रुप कार्यरत

गेल्या एक वर्षापासून आठ तरुणांचा एक गट बंद झालेले बस मार्ग पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. वडाळा, प्रतिक्षा नगर, दहिसर, मालवणी आणि बोरिवली सारख्या भागात बंद पडलेल्या लहान मार्गांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.या गटाने मेट्रो रेल्वे स्थानकांमधून फीडर मार्ग प्रस्तावित केले आहेत. बीकेसी, पवई, गोरेगाव, विक्रोळी या व्यावसायिक स्थानकांना विविध मेट्रो स्थानकांशी जोडण्याची आवश्यकता आहे.

प्रवाशांचे हाल

बेस्टने मुंबईतील बांद्रा,सायन,प्रभादेवी,माहिमसह नवी मुंबईला जोडणारे बस मार्ग सुसूत्रीकरणाच्या नावाखाली रद्द केले आहेत. कळंबोली-वडाळा मार्गावरील सी-५२ आणि ५०३ किंवा नेरुळ आणि घाटकोपरला जोडणारा ५११ ,खारघर-देवनार मार्गावरील ए-५०४ मार्गावरील बस कमी केल्या आहेत. यामुळे या मार्गावरील आणि शहरातील अनेक मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.

आवश्यकता काय

मुंबईतील लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात सेवा देण्यासाठी सुमारे ७ हजार बसची आवश्यकता आहे. काही वर्षापूर्वी ५ हजार बस चालवणाऱ्या बेस्टकडे आता केवळ ५०टक्के बस आहेत. रेल्वे स्थानकांना निवासी सोसायट्या आणि कार्यालयांशी जोडणारे विद्यमान कमी अंतराचे मार्ग किंवा फीडर मार्ग वाढवण्यासाठी बसची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

राज्य सरकार, महापालिकेने बेस्टला स्वमालकीच्या बस घेण्यासाठी निधी देणे गरजेचे आहे. एक हजार बस सहा महिन्यात बेस्टच्या ताफ्यात यायला हव्यात.विद्युत बसच्या पुरवठ्याला वेळ लागत असल्याने बेस्टने तात्काळ ५०० सीएनजी आणि ५०० विद्युत बस घ्याव्यात. सीएनजी बस विद्युत बस पेक्षा स्वस्त असून कमी वेळेत उपलब्ध होतील. -ए. व्ही. शेनॉय ,वाहतूक तज्ञ

सध्याची व्यवस्था सामान्य नागरिकांच्या विरोधात असल्याचे दिसून येते. थेट बेस्ट बस आता मिळत नाही.मेट्रोवर एक लाख कोटी खर्च केला जातो, मात्र २३ लाख मुंबईकर प्रवास करतात त्या बेस्टची मात्र दयनीय अवस्था आहे. सर्वाजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्वाचे स्थान असलेल्या बेस्टकडे दुर्लक्ष करणे हा मुंबईकरांचा अपमान आहे. -विद्याधर दाते,समन्वयक,आमची मुंबई आमची बेस्ट.