मुंबई : मुंबईकरांच्या सेवेत नादुरुस्त बेस्ट बस धावत आहेत. प्रवासी सुरक्षा धोक्यात येत असल्याने सेवेतील दोष असलेल्या बसचा शोध घेण्यासाठी तपासणी मोहीम राबवावी. तसेच वाहतूक विभागातील चौकशी पथकाने एका आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिले आहेत.
बेस्ट उपक्रमांमधील भाडेतत्वावरील बस संबंधित आगारातील अभियांत्रिकी विभागामार्फत तपासण्यात येतात. दरम्यान, तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त व धोकादायक ठरविलेल्या बसदेखील प्रत्यक्षात प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक बाब बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर (ठाकरे गट) यांनी निदर्शनास आणली आहे.
नितीन नांदगावकर यांनी दोन खाजगी बस कंत्राटदारांशी संबंधित दोषांची माहिती दिली. नांदगावकर यांच्या म्हणण्यानुसार, एका प्रकरणात आठ बसमध्ये दोष आढळले, तर दुसऱ्या प्रकरणात पाच भाडेतत्वावरील बसमधील दोष निदर्शनास आले. अनेक बसमध्ये मोठे तांत्रिक दोष असूनही, त्या प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर धावत आहेत.
स्टिअरिंग लॉकच्या समस्या, ब्रेक निकामी होण्याचा धोका, ब्रेक लाइनरच्या समस्या, वाहनाची एकूणच खालावलेली स्थिती, सुरक्षा उपायांचा अभाव आणि अपुऱ्या देखभालीचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये बसची योग्य दुरुस्ती न करताच, केवळ कागदोपत्री त्या दुरुस्त झाल्याचे दाखवून पुन्हा सेवेत दाखल करण्यात येत असल्याचा आरोप नांदगावकर यांनी केला आहे. धोकादायक बस चालविण्यासाठी चालकांवर दबाव टाकण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकारांमुळे अपघात होण्याची, प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची, तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होण्याची गंभीर शक्यता आहे. दरम्यान, बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भाडेतत्वावरील सर्व बसची नियमितपणे तांत्रिक तपासणी करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
* उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करावी.
* दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
* सर्व आगारांमधील कंत्राटी बसेसची तात्काळ सुरक्षा तपासणी करावी.
* अभियांत्रिकी विभागाच्या लेखी परवानगीशिवाय कोणतीही बस रस्त्यावर धावू नये.
बसचा एकूण ताफा – २,७८७
भाडेतत्वावरील – २,५३८
स्वमालकीच्या – २४९
