मुंबई : पर्यावरणाच्या रक्षणासाठी बेस्टची हरित इंधनावर धाव सुरू आहे. परंतु अपुऱ्या बस संख्येमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईतील एक लाख प्रवाशांमागे ५० बस असणे आवश्यक आहे. परंतु सध्या एक लाख प्रवाशांमागे बेस्टच्या केवळ १४ बस धावत असून मुंबईकरांना बसची बराच वेळ वाट पहावी लागत आहे.

बेस्ट ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. परंतु गेल्या काही वर्षांत बेस्टला आर्थिक घरघर लागली आहे. प्रशासनाने खर्चात कपात करण्यासाठी स्वमालकीच्या बस खरेदी करण्यापेक्षा भाडेतत्वावरील बस ताफ्यात दाखल करून घेण्यावर भर दिला. भाडेतत्वावरील बस निर्धारित वेळेत ताफ्यात दाखल होत नसल्याने त्याचा थेट परिणाम प्रवासी संख्येवर झाला आहे. बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना बराच वेळ थांब्यावर बसकरिता वाट पहावी लागते. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

महिला, ज्येष्ठ नागरिकांना बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बस पहिल्या थांब्यापासूनच भरून येत असल्याने मधल्या थांब्यावरील प्रवाशांना बसमध्ये चढताच येत नाही. यामुळे अनेकदा प्रवाशांना बस सोडावी लागते. दुसऱ्या बसकरिता किमान ४० मिनिटे वाट पहावी लागते.

सुमारे १० वर्षापूर्वी बेस्टची प्रवासी संख्या ३६ लाख होती. ती आता २३ लाखांवर आली आहे. प्रवासी संख्येत तब्बल ३६ टक्के घट झाली आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्या विद्युत (इलेक्ट्रिक) आणि सीएनजी बसची संख्या जास्त आहे. ही बाब चांगली असली तरी मुंबईकरांना आवश्यक असलेल्या बसचा आजही तुटवडा आहे. वर्ष २०२६-२७ पर्यत बेस्टच्या ताफ्यातील सर्व बस इलेक्ट्रिक असणार आहेत.

सकारात्मक बाब बेस्टच्या ताफ्यात सध्या २ हजार ७६७ बस आहेत. त्यापैकी भाडेतत्वावरील १ हजार २९३ विद्युत (इलेक्ट्रिक) आणि १ हजार २२५ बस सीएनजीवरील आहेत. यामुळे डिझेलमुळे होणारे प्रदूषण कमी झाले आहे.

बस आणि प्रवासी संख्येचा उतरता आलेख

वर्ष – बस- प्रवासी संख्या (लाखांत)

२०१५ – ४, २८८ -३६

२०१९ – ३,२०० – ३३

२०२३ – २,९६४ – ३३

२०२४ – २,९३२- ३०

२०२५ – २,७०३ – २४

२०२६ – २,७६७ – २३