मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बेस्टची भूमिक महत्त्वाची आहे. मात्र सध्या अपुऱ्या बस संख्येमुळे मुंबईकरांना बस प्रवासासाठी दीड तास (९०मिनिटांची) प्रतीक्षा करावी लागत आहे. शनिवारी दुपारी झकारिया मस्जिद जवळील बस थांब्यावर ७० -७५ वयोगटातील एक वृद्ध बसची वाट पहात उभे होते. माहिमसाठी बस कधी येईल, हे मला तपासून सांगू शकला का अशा प्रश्न त्यांनी एका तरुणाला केला. ते दुपारी अडीच वाजल्यापासून बसची वाट पहात होते. त्यांना दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर दुपारी ४ वाजता बस क्रमांक २ मिळाली.
बेस्ट ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओखळली जाते. किफायतशीर प्रवासासाठी प्रवासी बेस्टला प्राधान्य देतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाने आर्थिक खर्च कमी करण्यासाठी काटकसरीचा उपाय म्हणून स्वमालकीच्या बसऐवजी भाडेतत्वावरील बस ताफ्यात घेण्यावर भर दिला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ २४९ बस, तर भाडेतत्वावरील २ हजार ५४३ बस आहेत. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी सुमारे ७ ते ८ हजार बस रस्त्यावर धावणे आवश्यक आहे. मात्र सध्या बेस्टच्या ताफ्यात फक्त पावणे तीन हजार बस असल्याने प्रवाशांना बससाठी बराच वेळ ताटकळत बस थांब्यावर उभे रहावे लागते. त्यामुळे मुंबईकर हैराण होत आहेत.
बस थांब्यावर उभ्या असलेल्या वृद्धाला बस क्रमांक १ किंवा ५१ बद्दल जाणून घ्यायचे होते. ‘बेस्ट’चे ॲप तपासून बस ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’जवळ आल्याचे सदर तरुणाने त्यांना सांगितले. त्यानंतर झालेला संवाद मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल कोणत्याही अधिकृत सादरीकरणापेक्षा अधिक काही सांगून गेला. त्या वृद्ध प्रवासी दुपारी २.३० पासून बस थांब्यावर बसची वाट पाहत होते. त्या दीड तासाच्या प्रतीक्षेत, माहीमच्या दिशेने जाणारी केवळ बस क्रमांक २ आली होती.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, मार्ग क्रमांक १, २ आणि ५१ वरील बस माहीमला जात असूनही, बस क्रमांक २ चा थांबा विनाकारण वेगळ्या ठिकाणी आहे. तसेच, त्या वयात ती बस पकडण्यासाठी धावत जाणे त्यांना शक्य नव्हते आणि त्यामुळे ती संधी हुकल्याचे त्यांनी सांगितले. अखेरीस दुपारी ४ वाजता बस क्रमांक ५१ आली. वृद्ध व्यक्ती आणि तरुण दोघेही माहीमच्या दिशेने जाण्यासाठी त्यात चढले. त्यांना इच्छित बससाठी ९० मिनिटे घालवावी लागली.
