मुंबई : बेस्टच्या बसची संख्या कमी झाल्याने शहरातील अनेक बस मार्ग बंद झाले आहेत. या मार्गांवरील प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात शेअर रिक्शा-टॅक्सीची संख्या वाढली आहे. शेअर रिक्शा-टॅक्सीमध्ये सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. शेअर रिक्शा-टॅक्सीमुळे मुंबईकरांचा प्रवास बेस्टच्या बसच्या तुलनेत वेगवान झाला असला तरी त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. घडयाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना वेळ फार महत्त्वाची आहे.
मुंबईकर एका-एका मिनिटांचा विचार करतात. परंतु सध्या बेस्ट बसची संख्या कमी असल्याने शहरातील काही बस मार्ग बंद झाले आहेत. अनेक बस मार्गांवर बस ४५ ते ५० मिनिटांनी येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी शेअर रिक्शा-टॅक्सी सुरू झाल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानक ते कार्यालय, गृह संकुलांदरम्यान शेअर रिक्शा – टॅक्सी धावत आहेत.
पूर्व आणि पश्चिम उपनगरात शेअर रिक्शा मोठ्या प्रमाणात धावतात. परंतु याकरिता मुंबईकरांना थोडे जादा पैसे मोजावे लागत आहेत. बेस्टच्या किमान प्रवासासाठी १२ रुपये मोजावे लागतात तेथे आता शेअर रिक्शासाठी प्रती प्रवासी १५ रुपये, तर टॅक्सीसाठी प्रती प्रवासी २० ते २५ रुपये द्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. त्यातच एका घरातील तीन ते चार सदस्य कामानिमित्त, महाविद्यालयात जात असतील तर त्यांचा महिन्याचा खर्च वाढत आहे. त्यामुळे बेस्टच्या बसची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहेत.
दक्षिण मुंबईत शेअर टॅक्सी
चर्चगेट येथून कुलाबा, नरिमन पॉईंट आदी परिसरात बेस्टच्या बस जातात. पण त्या तुलनेत शेअर टॅक्सीची सेवा अधिक आहे. झटकन उपलब्ध होणाऱ्या शेअर टॅक्सीला प्रवासी पसंती देत आहेत. काही प्रवासी चालत सीएसएमटी,चर्चगेट स्थानकापर्यंत जातात.
मेट्रोचा आधार
घाटकोपर – अंधेरीदरम्यान मेट्रो १ धावते. त्यामुळे या दरम्यानच्या प्रवाशांची रस्ते वाहतूक कोडींतून सुटका झाली असून त्यांना बससाठी वाट पहावी लागत नाही. सीएसएमटी – विधान भवन मेट्रो सुरु झाल्याने दक्षिण मुंबईतील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बेस्टच्या बसमार्गांची संख्या
मुंबई – ३८५
नवी मुंबई – १२
मीरा भाईदर – १०
एकुण – ४०७
