मुंबई : मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासाकरिता बरीच वाट पहावी लागतेच, ते वाट पाहणेही सुखावह नसते. अनेक ठिकाणी बस थांब्याची दुर्दशा झाली असल्याने प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागतो. बेस्ट प्रशासनाने किमान बस थांबे तरी सुस्थितीत उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बेस्टच्या बसने दिवसभरात जवळजवळ २३ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टच्या बसची संख्या प्रवाशांच्या तुलनेत फारच कमी असल्याने प्रवाशांना किमान ४० ते ४५ मिनिटांची प्रतिक्षा करावी लागते. बसची वाट पहात प्रवासी बस थांब्यावर उभे राहतात. मात्र शहरातील अनेक बस थांबे हे सुस्थितीत नाहीत. मुंबई शहरात बेस्टचे सुमारे सहा हजार बस थांबे आहेत.

शहरातील अनेक बेस्ट बस थांबे सध्या दयनीय अवस्थेत असून, तुटलेले छप्पर, बसण्यासाठी बाकांची कमतरता, अस्वच्छता अशी परिस्थिती दिसते. अनेक ठिकाणी बस थांबे बेवारस पडले आहेत. काही बस थांब्यावर रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने प्रवाशांना, खासकरुन महिला प्रवाशांना असुरक्षित वाटते. बस थांब्यांच्या आसपास कचरा आणि घाण साचलेली आहे. थांब्यांच्या देखभालीकडे बेस्ट प्रशासन आणि महापालिका दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक बस थांब्यांच्या जवळ परवानगी नसतानाही खासगी वाहने उभी असल्याने प्रवाशांना उभे राहण्यास जागा मिळत नाही.

प्रवाशांना बसची माहिती देणारे डिजिटल फलकही बंद अवस्थेत आहेत. काही थांब्यांचा वापर रस्त्यावरील भिक्षेकरी कपडे सुकविण्यासाठी करतात. काही ठिकाणी बस थांबे पदपथावर असल्याने उंचीवर आहेत. तेथे प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येतात. मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेरील बस थांब्यावर प्रवाशांना उन्हात बसची वाट पहात राहावे लागते. त्यामुळे मुंबईकरांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागतो.

शहरातील अनेक बस थांबे जुने झाले आहेत. सध्याचा कडक उन्हाळा आणि येणारा पावसाळा पाहता बेस्ट प्रशासनाने तातडीने बस थांब्याची पाहणी करुन त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. खास करुन मुंबई बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना कोणती बस कुठे जाते याची माहिती मिळत नाही. त्यामुळे बस थांब्यावर बस मार्गांची माहिती देणे आवश्यक आहे. याबाबत बेस्ट प्रशासनाला पत्र पाठविले आहे. – नितीन नांदगावकर,(ठाकरे), बेस्ट समिती सदस्य

आवश्यकता काय

➤ प्रवाशांची सुरक्षा, आरामासाठी चांगल्या प्रकारे डिझाइन आणि देखभाल केलेले बस थांबे
➤ बस थांब्यावर स्पष्ट मार्ग तपशील आणि आगमन माहिती असावी
➤ बसण्यासाठी पुरेशी जागा असावी.
➤ बाल मदत, महिला मदत, आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्कालीन बोर्ड असावेत.