मुंबई: बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा, निवृत्त कर्मचाऱ्यांंची एकरकमी देणी देण्यासह विविध मागण्यांसाठी बेस्टचे कर्मचारी गुरुवार, १८ जूनपासून आंदोलन करणार आहेत. कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने शहरातील वीजपुरवठा खंडीत होण्याचा आणि बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांचे हाल होणार आहेत.
बेस्ट प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत, अशा धोरणांना पाठिंबा देणाऱ्या सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात सर्व कामगार संघटना संयुक्तपणे १८ जूनपासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी दुपारी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला.
बेस्टचा ‘क’ अर्थसंकल्प महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करावा, निवृत्त कामगारांची कायदेशीर देणी एकरकमी द्यावी, २०१६ ते २०२६ चा वेतन करार ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह द्यावा, बेस्टचे परिवहन व वीज विभागाचे कंत्राटीकरण रद्द करून भाडेतत्वावरील कामगारांना बेस्टमध्ये सामावून घ्यावे, बेस्टच्या स्वःमालकीच्या ५ हजार बस आणाव्या, आवश्यक कामगार भरती करावी, ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेने पदोन्नती द्यावी, बेस्ट उपक्रमाच्या मालमत्ता लाँग लिज अथवा अन्य मार्गाने विकू नये, पी.पी.पी. मॉडेलऐवजी स्वयंविकासाचे धोरण स्वीकारावे आदी विविध मागण्यांसाठी उपक्रमातील विविध कामगार संघटनांनी एकत्र येत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची स्थापना करून बेस्ट व महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारसमोर मांडल्या आहेत.
