मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी ”बेस्ट वर्कर्स युनियन”ने मंगळवारपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या संपाला अल्प प्रतिसाद मिळाला. दुपारी ३ पर्यंत नियोजित २,१४२ बसपैकी १,९८७ बस रस्त्यांवर उतरल्या होत्या. तर केवळ १५५ बस आगारात उभ्या राहिल्या होत्या. यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फारसा फटका बसला नाही.

बेस्ट उपक्रमातील नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी मुंबईत उपोषणाची घोषणा केली. हे बेमुदत उपोषण मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळपासून सुरू झाले. मुंबईत ऑपेरा हाऊस येथील ४२ केनेडी ब्रिज स्थित बेस्ट वर्कर्स युनियनच्या मध्यवर्ती कार्यालयात बेस्ट कर्मचारी हे आंदोलन करीत आहेत.प्रशासन मागण्या मान्य करेपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका सरचिटणीस शशांक राव यांनी मांडली आहे.

मागण्या काय?

कर्मचाऱ्यांचे २०१६-२०२१ व २०२१-२०२६ या कालावधीतील वेतन करार प्रलंबित आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, खासगी कंपन्यांमार्फत चालविल्या जाणाऱ्या बेस्ट बसवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. शिवाय, २०१० व २०२४मध्ये विद्युत विभागात हंगामी कामगार म्हणून नियुक्त होऊन नंतर कायम झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पहिल्या दिवसापासून कायमस्वरूपी मानून वेतन निश्चित करावे.