मुंबई : ‘चलो’ बस कराराची आर्थिक अनियमितता, महसूल वाटणी आणि सबसिडीच्या मुद्द्यांवरून बेस्ट समितीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. बेस्ट समितीचे सदस्य (भाजपा) अजय सिंग यांनी या करारात गंभीर आर्थिक अनियमितता असल्याचा संशय व्यक्त केला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून कराराची सखोल चौकशी व स्वतंत्र तपास करण्याची मागणी केली आहे.
‘फेम’ योजनेअंतर्गत बेस्टला प्रतिबस मिळालेली ५० लाखांची सबसिडी ‘चलो’कडे वर्ग करण्यात आल्याबाबत समितीने प्रश्न उपस्थित केले आहेत. या ५०कोटींच्या सबसिडीच्या बदल्यात बेस्टला ‘चलो’च्या एकूण महसुलातून मिळणारा फक्त ४ टक्के वाटा आर्थिकदृष्ट्या बेस्टच्या हिताचा नसल्याचा आरोप समिती सदस्य अजय सिंह यांनी केला. ‘चलो’द्वारे चालवल्या जाणाऱ्या बसना बेस्टच्या आगारांमध्ये नाममात्र दरात पार्किंग देणे आणि मुंबईबाहेर इतर रस्त्यांवर बेस्टचा लोगो असलेल्या बस बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणे यावरही आक्षेप घेतला आहे.
समितीच्या मागण्या
– बेस्टला पहिल्या दोन वर्षांत सुमारे २.०७ कोटी रुपये मिळाले असून, पुढील १२ वर्षांत सुमारे १२ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, १२ वर्षांच्या कालावधीतील अंदाजित महसुली वाटा खूपच कमी असताना, ५० कोटी रुपयांचे अनुदान देण्यामागील आर्थिक तर्कशुद्धतेवर अजय सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
– ‘बेस्ट ही मुंबईकरांची सार्वजनिक मालमत्ता आहे. कोणत्याही खासगी कंपनीसोबतच्या करारामध्ये बेस्टचे हित सर्वोच्च राहिले पाहिजे,’ असे म्हणत सिंग यांनी या करारामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.
– बेस्टला मिळणारे प्रति बस ५० लाख रुपयांचे अनुदान ‘चलो’ योजनेकडे हस्तांतरित करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा निर्णय ज्या प्रक्रियेद्वारे घेण्यात आला, त्या प्रक्रियेची छाननी करण्याची मागणी केली.
– डिसेंबर २०२२ मध्ये करार झाल्यानंतर कंपनीला दिलेल्या सहा महिन्यांच्या ‘सवलतीच्या कालावधी’बद्दल चिंता व्यक्त केली. महसूल वाटप जून २०२३ पासूनच सुरू झाले.
तसेच आणिक आणि मरोळ आगारात १०० विद्युत बस नाममात्र शुल्कात पार्किंगच्या जागेच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘बेकायदा पार्किंगबाबत कठोर नियम हवे’ ‘
चलो’द्वारे चालवल्या जाणाऱ्या ४० सीएनजी बसवर बेस्टचा लोगो असूनही, खारघरसारख्या भागांमध्ये रात्रभर रस्त्यावर उभ्या केल्या जातात. अशा पार्किंगमुळे बेस्टच्या सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बेस्ट लोगोचा वापर व बसच्या पार्किंग संबंधीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सिंग यांनी कराराचा, त्यातील महसूल – वाटप आणि कार्यान्वयन अटींसह तात्काळ आढावा घेण्याची आणि बेस्टच्या सार्वजनिक संसाधनांच्या वापराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
