मुंबई : बेस्टच्या विद्युत बस आणि आगारांमधील वाहन चार्जिंगसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीतर्फे आगारामध्ये वीजपुरवठा करण्यात येतो. दरम्यान. बेस्टला भाडेतत्वावरील बस पुरविणाऱ्या ओलेक्ट्रा कंपनीने वीज बील अदा न केल्याने बुधवार दुपार १.३० पासून गुरुवार सकाळ ११.३० पर्यत गोराई, मजास आणि घाटकोपर आगारातील वीजपुरवठा अदानी इलेक्ट्रिसिटीने खंडीत केला. यामुळे मजास आगारातील २२ विद्युत बस चार्जिग सेवा उपलब्ध नसल्याने बस धावू शकल्या नाहीत. तर घाटकोपर आगारातील १६ बसला विलंब झाला. यामुळे या परिसरातील प्रवाशांचे हाल झाले.

बेस्टच्या ताफ्यात २ हजार ७०० बस आहेत. त्यापैकी अडीच हजार बस भाडेतत्वावरील आहेत. यात ९० टक्के बस या विद्युत बस आहेत. बेस्टला सहा कंपनीतून भाडेतत्तावर बसपुरवठा होतो. त्यामध्ये ओलेक्ट्रा कंपनीचाही समावेश आहे. बेस्टची बस सेवा सुरळीत आणि अखंडितपणे सुरू राहण्यासाठी विद्युत बस चार्जिग असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. बस पुरविणाऱ्या कंत्राटदारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी बेस्ट प्रशासन दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वी त्यांच्या देयकाच्या ८० टक्के रक्कम त्यांना अदा करते. उपक्रमाकडून रक्कम मिळाल्यानंतरही ओलेक्ट्रा कंपनीने अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे वीज बिल वेळेत न भरल्यामुळे गोराई, मजास आणि घाटकोपर आगारांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. परिणामी, विद्युत बसची चार्जिग सेवा विस्कळीत झाली.

बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांच्या त्रासात भर

  • या आगारातील चार्जिग वीजपुरवठ्याअभावी बंद असल्याने सांताक्रुझ आगारातून काही बसचे चार्जिग करण्यात आले. तर काही बस चार्जिग नसल्याने आगारात उभ्या राहिल्याने प्रवासी सेवेत रस्त्यावर आल्या नाहीत.
  • विक्रोळी आगारातही गुरुवारी चार्जिगची समस्या होती. आधीच बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना बसकरिता किमान ४० मिनिटे प्रतीक्षा करावी लागते. त्यातच बसची संख्या आणखी कमी झाल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडल्याचे बेस्ट समिती सदस्य (भाजपा) अजय सिंह यांनी सांगितले.
  • बेस्ट समितीच्या पुढील बैठकीत याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करणार असून तसे पत्र समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना देणार असल्याचे अजय सिंह यांनी सांगितले.

वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा

दरम्यान, याबाबत अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीकडे विचारणा केली असता जनसंपर्क विभागाने बेस्टच्या आगारांची वीज खंडीत केली नसल्याचे सांगितले. तसेच याबाबत बेस्ट उपक्रमाकडे विचारणा करण्यास सांगितले. उपक्रमाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगत वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा केला.