मुंबई : मुंबईकरांसह पर्यटकांच्या पसंतीच्या बेस्टच्या विद्युत दुमजली (डबलडेकर) बसचा ताफा वाढणार आहे. तांत्रिक व कराराशी संबंधित समस्यांमुळे तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेला १५० विद्युत डबलडेकर बसचा पुरवठा आता पुन्हा सुरू होणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. दरम्यान, विद्युत डबलडेकर बसमध्ये ‘ईव्हीएससी’ प्रणाली बसविण्यासाठी प्रति बस ३.८५ पैसै कंत्राटदाराला अदा करण्यास बेस्ट समितीने बुधवारी झालेल्या समिती सभेत मंजुरी दिली. त्यामुळे या १५० विद्युत डबलडेकर बस बेस्टच्या ताफ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेस्टने २०२२ मध्ये प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी २०० विद्युत डबलडेकर बसची कंत्राट दिले होते. मात्र, आतापर्यंत त्यातील केवळ ५० गाड्या उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या. तर उरलेल्या १५० बसचा पुरवठा झालाच नाही. बसच्या पुरवठ्यात बराच विलंब होत असल्याने बेस्टला प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गावर बस पुरविण्यात अडचणी येत आहेत. बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना बससाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. १५० विद्युत डबलडेकर बसचा पुरवठा कराराच्या अटींशी संबंधित एका तांत्रिक समस्येमुळे थांबला होता. हे प्रकरण ॲटर्नी जनरल यांच्याकडे गेले होते.
तांत्रिक समितीने कराराच्या अटींची तपासणी केली. त्यानंतर समितीने केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार किंमतीतील किरकोळ बदलास मंजुरी देण्याची शिफारस केली. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने सुधारित प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केला. सुधारित प्रस्तावात विद्युत डबलडेकर बसमध्ये वापरली जाणारी ईव्हीएससी प्रणाली बसविण्यासाठी कंत्राटदार कंपनीला प्रति बस वाढीव ३.८५ पैसे देण्यात येणार असल्याची माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली. ईव्हीएससी प्रणाली विद्युत डबलडेकर बसची सुरक्षितता, बॅटरी व्यवस्थापन आणि गतीसाठी महत्त्वाची प्रणाली आहे.
मुंबईकरांसह पर्यटकांमध्येही डबलडेकर बसचे आकर्षण आहे. प्रवाशांच्या सेवेत जास्तीत जास्त डबलडेकर बस असणे ही काळाची गरज आहे. या १५० डबलडेकर बसपैकी १० बस ओपन डेकच्या करण्यात याव्यात. जेणेकरून पर्यटक, मुंबईकरांना संध्याकाळच्या वेळी खासकरून दक्षिण मुंबईची सफर करता येईल. यातून बेस्टलाही महसूल मिळेल.- तृष्णा विश्वासराव, अध्यक्षा, बेस्ट समिती
