मुंबई : लोकल, रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चोराला वांद्रे रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सीसीटीव्ही चित्रिकरण आणि मिळालेल्या माहितीदाराच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन मोबाइल आणि सोन्याचे दागिने असा एकूण १.१७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
चर्नी रोड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१९ च्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार फलाटावर उभे राहून मोबाइलवर बोलत असताना, धावत्या लोकलमधील एका चोराने त्यांच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी त्यांनी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास वांद्रे युनिट क्रमांक ६ च्या पथकाकडे सोपविण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रोहित मंज्जी सातल्या ऊर्फ खारवा (२५) याला ताब्यात घेतले. आरोपी वसई येथील असून त्याचे मुळगाव गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
आरोपीकडून २७ हजारांचे दोन मोबाइल आणि ९० हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार व लटकन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध वडाळा, सीएसएमटी, अंधेरी, कुर्ला, कल्याण, मुंबई सेंट्रल, बोरिवली आणि वसई येथील रेल्वे पोलीस ठाण्यांत चोरी व जबरी चोरीचे ११ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
