मुंबई : मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतूक प्रवासात आता आधुनिकतेची भर पडणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांच्या सेवेत ४८ नव्या विद्युत वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. या नव्या बसमुळे गर्दीच्या मार्गांवर अधिक प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. या बसगाड्याची आसन क्षमता ४१ इतकी असून या बसमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
‘ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने बेस्ट उपक्रमाला या ४८ बसचा पुरवठा केला आहे. १२ मीटर लांबीच्या या बस भाडेतत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. या बसच्या समावेशामुळे बेस्टच्या ताफ्यातील डबल डेकर बसची संख्या ९८ वर पोहोचणार आहे. मागाठाणे आगारात मंगळवारी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या उपस्थितीत नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले.
नव्या विद्युत दुमजली बसची सर्वांत मोठी जमेची बाजू म्हणजे जादा प्रवासी क्षमता आहे. एकाच बसमधून अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार असल्याने गर्दीच्या मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत बसमध्ये जागा मिळविण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्याची अपेक्षा आहे. वातानुकूलित सुविधेमुळे उकाड्यातही प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.
बसमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र दरवाजा देण्यात आला असून, प्रवाशांना बसमध्ये चढणे-उतरणे अधिक सोयीचे होणार आहे. या बसमधील बॅटरीचे वजन १६ टनांनी कमी केली असून बॅटरी बसच्या खालच्या भागात सुरक्षितपणे बसविण्यात आली आहे. सीसीएस-२ तंत्रज्ञानामुळे चार्जिंगचा वेग ५८ टक्क्यांनी अधिक असल्याने बसचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येणार आहे.
सुरक्षेसाठी आधुनिक यंत्रणा
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये एबीएस, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा, हायड्रॉलिक पॉवर असिस्टेड स्टीअरिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन ट्रॅकिंग प्रणाली आणि आपत्कालीन पॅनिक बटण देण्यात आले आहे. कमांड कंट्रोल सेंटरशी जोडलेली व्हिडिओ विश्लेषण प्रणालीही कार्यरत राहणार आहे. त्यामुळे बसच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविणे शक्य होणार आहे.
पाच मार्गांवर ४४ बस धावणार
एकूण ४४ बस मागाठाणे आगारातून पाच मार्गांवर चालविण्याचे नियोजन आहे. कांदिवली पूर्व बस स्थानक, संघर्ष नगर (चांदिवली), समर्थ नगर बस स्थानक (कांदिवली पूर्व) तसेच मागाठाणे आगाराशी संबंधित मार्गांवर या बस धावणार आहेत. याशिवाय बोरिवली पूर्व, ठाणे पूर्व आणि मीरा रोड पूर्व स्थानकांना जोडणाऱ्या मार्गांचाही विचार करण्यात आला आहे. दरम्यान, पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत बेस्टसाठी १,५०० मिडी बस खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २,४०० विद्युत वातानुकूलित बस खरेदीचा प्रस्ताव असून, त्यापैकी २,००० बस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.
