मुंबई :देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत सुरू असलेल्या घोषित भारतमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. एकीकडे पाऊस नाही, दुसरीकडे असह्य उकाडा आणि त्यातच दोन-दोन दिवस होणाऱ्या अघोषित भारनियमन यामुळे मुंबईकरामध्ये तीव्र संतापची लाट उसळली आहे. या भारनियमनाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. अमीन पटेल, कॅप्टन सेलवन यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मुंबईत विशेषतत: दक्षिण मुंबईत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत सभागृहातच धरणे आंदोलन केले.

नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रारंभी ही लक्षवेधी ऊर्जा विभागाशी संबधित असल्याने ऊर्जा विभागाकडून उत्तर घ्यावे. नगरविकासचा प्रकरणात संबंध नाही असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील वीज पुरवठा बेस्टच्या माध्यमातून होत असल्याने हा विषय नगर विकास विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले. मुंबईतील विजेची मागणी वाढत असल्यामुळे वीज वाहिन्यांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यातून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. तसेच विद्युत वाहिन्या मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होत असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

मुंबईत बेस्टच्या अख्यत्यारीत असणाऱ्या विभागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, त्यावर बेस्ट कडून काहीही ठोस उपाययोजना होत नाहीत, त्यामुळे या सगळ्याची गंभीर दखल घेण्यात येऊन सरकारने तशा कडक सूचना द्याव्यात असे निर्देश देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या या विषयावर आपल्या दालनात बैठक घेतली जाईल असं जाहीर केलं.

बेस्टच्या वीज पुरवठ्यावर गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले, दक्षिण मुंबईचे सर्वच आमदार यावर आक्रमक झाले होते, याबाबतची लक्षवेधी सूचना अमीन पटेल आणि तमिळ सेल्वन यांनी उपस्थित केली होती. अजय चौधरी, रईस शेख आदींनी उपप्रश्न विचारले. यावर बेस्ट विभागाच्या अडचणी सादर करण्याचा प्रयत्न नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या उत्तरात केला. मात्र सदस्य आणि अध्यक्ष या विषयावर आक्रमक झाले होते. मुंबईतच विजेचं भारनियमन सुरू आहे ही बाब गंभीर आहे असं अध्यक्ष म्हणाले.