मुंबई : बेस्ट उपक्रमातून १ ऑगस्ट २०२४ पासून निवृत्त झालेल्या सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळेपर्यंत ९९ रुपयांत वर्षभराचा पास मिळणार आहे. बेस्ट दिनाचे औचित्य साधून ७ ऑगस्ट रोजी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पाच कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पास देण्यात येतील. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बेस्टतर्फे स्वातंत्र्यसैनिक, विदयार्थी, अपंग प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. बेस्टच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची देणी मिळण्यात विलंब होत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना देणी थकल्याने वारंवार उपक्रमाच्या कार्यालयात खेटे घालावे लागतात. हक्काची रक्कम थकल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत असताना प्रवासाकरिता पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसपास देण्याची मागणी होत होती.

बेस्टच्या नियमाप्रमाणे मोफत बसपास देण्यात येत नाही. त्यामुळे बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षाला ९९ रुपये आकारून बसपास देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून निवृ्ृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या पासचा लाभ घेता येणार आहे. हा बसपास कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी अदा होईपर्यंतच मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी त्यांची पूर्ण रक्कम मिळेल, त्या दिवशी कर्मचाऱ्यांकडून बसपासचे पैसे घेण्यात येतील. तसेच त्यांना बसपास बेस्टकडे जमा करावा लागणार आहे. या योजनेची सुरुवात बेस्ट दिनापासून होणार आहे.

१२०० कोटींची देणी प्रलंबित

मुंबई महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बेस्टला १ हजार कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. त्यापैकी ५०० कोटी बेस्टला दिले आहेत. या ५०० कोटीच्या रक्कमेतून बेस्टने ऑगस्ट २०२४ पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ४६१ कोटी रुपयांची थकीत देणी अदा केल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दिली. तसेच उर्वरित ५०० कोटी रुपयांकरिता महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. साडेतीन हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी सुमारे १२०० कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत.

निवृत्त झालेले कर्मचारी – अदा निधी

मे २०२४

– २२७ कोटी जून २०२४ – १३१ कोटी

जुलै २०२४ – ३७ कोटी

ऑगस्ट २०२४ – ३५ कोटी