मुंबई : वीज वितरण प्रक्रिया अधिक अद्ययावत करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाने स्मार्ट मीटर योजना राबविली. या योजनेंतर्गत आतापर्यंत पाच लाख ५० हजार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरची जोडणी देण्यात आली. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या वीज ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी पाचदरम्यान प्रती युनिट ५० पैसे सवलत देण्यात येते. या सवलतीपोटी आतापर्यंत पाच कोटी ५० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. तसेच ग्राहकावर प्रीपेड वीज मीटरची सक्ती नाही.

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून १० लाख ६० हजार वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात येतो. वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक व अद्ययावत करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने स्मार्ट मीटर योजना अमलात आणली आहे. स्मार्ट मीटर योजना फक्त कंपनीच्या फायद्यासाठी आहे, असा आरोप काँग्रेस, शिवसेनेने (ठाकरे गट) अनेकदा केला आहे. मात्र स्मार्ट मीटर वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी असून स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आपण रोज किती वीज वापरली याची माहिती रोजच्या रोज उपलब्ध होते. स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. स्मार्ट मीटर खरेच उपयुक्त आहे, हे पटल्यानंतर वीज ग्राहक स्मार्ट मीटर बसवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. एकूण १० लाख ६० हजार वीज ग्राहक असून पाच लाख ५० हजार घरात स्मार्ट मीटरची जोडणी करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रीपेड मीटर ऐच्छिक

प्रिपेड मीटर बसवल्यानंतर देयक अदा केले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, हा वीज ग्राहकांचा समज चुकीचा आहे. ग्राहकाला हवे असेल तरच त्याचे वीज मीटर प्रीपेड करुन देण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.