मुंबई : स्मार्ट मीटर बसविण्यापासून वीज देयकात भरमसाठ वाढ झाल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. काही ग्राहकांना ९ ते २२ हजार रुपये वीज देयक आले आहेत. ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून बेस्टच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांच्या शंकाचे निरसन करून त्यांचे मीटर तपासण्यासाठी शहरातील प्रभागानुसार (वॉर्ड) विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

बेस्टकडून दक्षिण मुंबई व शहर भागात वीजपुरवठा करण्यात येतो. बेस्टचे सुमारे १०.५ लाख वीज ग्राहक आहेत. राज्यात नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज देयक दुप्पट वा तिप्पट येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मुंबई, ठाणे, नागपूर, कल्याण व पुण्यात या वाढीव देयकांमुळे व सक्तीविरोधात नागरिक व राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. मुंबई शहरात बेस्टतर्फे ६० टक्के वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटरची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील गिरगाव व आसपासच्या भागात काही महिन्यांपासून विजेचा लंपडाव सुरू आहे. तांत्रिक बिघाडांमुळे १२ ते १४ तास वीज नसते. तरीही या भागातील नागरिकांचे वीज देयक हजारांच्या घऱात आल्याचे बेस्ट समिती सदस्य (भाजप) आकाश पुरोहित यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या सूचना, तक्रारी सोडविण्यासाठी उपक्रमाने देयक रिडिंग अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तर धारावी परिसरातील नागरिकांना वीज देयक भरण्यासाठी असलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी देयक मिळते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे बेस्ट समिती सदस्य (भाजपा) रमाकांत गुप्ता यांनी सांगितले.

स्मार्ट मीटर लावण्याची योजना केंद्र सरकारची आहे. सध्या बेस्टच्या ६० टक्के वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आली आहेत. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याची जबाबदारी बेस्टची आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागानुसार मोहीम राबविण्यात येणार आहे.- सोनिया सेठी, महाव्यवस्थापक,बेस्ट उपक्रम.