मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने बुधवारी आणखी १४ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले. बेस्ट उपक्रम तोट्यात असताना पदोन्नतीचा सपाटा सुरू असून त्याला बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने विरोध केला आहे. तरीही आणखी १४ अधिकाऱ्यांना बढती दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

बेस्ट उपक्रमाचे चाक कर्जाच्या चिखलात रुतलेले असताना बेस्टमध्ये अधिकाऱ्यांना बढती देण्याचे सत्र सुरू आहे. एका बाजूला सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची देणी देण्यास उपक्रमाकडे निधी नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र सेवानिवृत्तीला दहा दिवस, एक महिना उरलेला असताना पदोन्नती दिली जात आहे. यावर बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने आक्षेप घेतला असून जो पर्यंत बेस्ट सेवानिवृत्त कामगारांची हक्काची देणी देत नाही व बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तो पर्यंत अधिकाऱ्यांना बढती देऊ नये, अन्यथा बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. या प्रकरणी समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र लिहिले आहे.

मात्र समितीने इशारा दिला त्याला एक दिवस उलटत नाही तोच आणखी पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहेत. लेखा, लेखापरीक्षण, अंदाजपत्रक व रोख विभागातील अधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार ‘ए ’ आणि ‘बी’ ग्रेडमधील एकूण १४ अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली असून, या नियुक्त्या २९ मे २०२६ पासून किंवा पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होणार आहेत.

‘ए ’ ग्रेड पदोन्नती आदेशांतर्गत ११ अधिकाऱ्यांना विविध वरिष्ठ पदांवर बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये उप मुख्य लेखा अधिकारी, उप मुख्य व्यवस्थापक (लेखापरीक्षण), वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक मुख्य लेखा अधिकारी, प्रशासकीय व्यवस्थापक (रोख) आणि अंदाजपत्रक अधिकारी या पदांचा समावेश आहे. बहुतांश पदे निवृत्ती अथवा आधीच्या पदोन्नतीमुळे रिक्त झाली होती. तर स्वतंत्र आदेशाद्वारे ‘बी’ ग्रेडमधील तीन अधिकाऱ्यांना वरिष्ठ लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (रोख) आणि उप मुख्य लेखापाल पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे.

दरम्यान, आता पदोन्नती दिलेले अधिकारी जेव्हा बेस्ट मधून सेवानिवृत होतील तेव्हा त्यांना निवृत्ती नंतर जवळपास ८ ते १० लाखांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. वेगवेगळ्या विभागातील वरिष्ठ अधिकारी वर्गास पाच वर्षात ही पाचवी बढती आहे. गेली २० ते २५ वर्ष काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला मात्र एक प्रमोशन का देऊ शकत नाही, असा सवाल समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी केला आहे. गेल्या चार वर्षात बेस्ट मधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची जवळपास पाच हजार कुटुंबे मोठ्या आर्थिक गर्तेत अडकली आहेत. काही तर आपले सेवानिवृत्तचे पैसे न घेताच मयत झाले आहेत. तरीही बेस्ट उपक्रम पदोन्नती देत सुटले आहेत, असेही पानवडीकर यांनी सांगितले.