मुंबई : आर्थिक तोट्यातील बेस्ट उपक्रमाची काटकसर मुंबईकरांच्या जीवावर बेतत आहे. खर्च कमी करण्यासाठी ताफ्यात समाविष्ट केलेल्या भाडेतत्वावरील बसच्या देखभाल – दुरुस्तीचा प्रश्न आणि वाढलेल्या अपघातांमुळे मुंबईकरांचा रोजचा प्रवास असुरक्षित बनला आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्टच्या भाडेतत्वावरील बसच्या अपघातात ४० मुंबईकरांना प्राण गमवावे लागले आहेत. गुरुवारी सकाळी मातेश्वरी कंपनीच्या भाडेतत्वावरील बसच्या धडकेत मालाड येथे एका टॅक्सी चालकाचा मृत्यु झाला. त्यामुळे पुन्हा एकदा भाडेतत्वावरील बसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेपाठोपाठ बेस्ट मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. किफायतशीर आणि सुरक्षित प्रवास म्हणून लाखो मुंबईकर आजही बेस्टच्या प्रवासाला पंसती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट बसच्या अपघातात वाढ झाली आहे. बेस्टच्या ताफ्यातील २ हजार ७९२ बसपैकी फक्त २४९ बस स्वमालकीच्या आहेत. भाडेतत्वावरील बसच्या अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देखभालीअभावी भाडेतत्वावरील बस अचानक शॉर्ट सर्किट होऊन पेट घेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येतो.
उपलब्ध आकडेवारीनुसार, भाडेतत्वावरील बसच्या अपघातात २०२४-२५ मध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२५-२६ मध्ये बेस्ट उपघातात २०२५-२६ मध्ये २१ जण मृत्युमुखी पडले. याउलट, याच कालावधीत बेस्टच्या स्व-मालकीच्या बस अपघातातील मृत्यू पाचवरून तीनपर्यंत घटले. वाढत्या अपघातांमुळे बेस्ट उपक्रमाने बसची तपासणी वाढवली असून अधिक कडक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत. सीएनजी आणि विद्युत बस चालवणाऱ्या सर्व कंत्राटी चालकांसाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण अनिवार्य केले आहे.
आगीच्या घटनांमुळे चिंतेत वाढ
मे महिन्यात चार बसला लागलेल्या आगीच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. प्रतीक्षा नगर आगारामध्ये दोन बस आगीत जळून खाक झाल्या, तर सांताक्रूझमध्ये आणखी एका सीएनजी बसला आग लागली होती.
कंत्राटदारांना नोटीस
बेस्टने देखभालीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यास आणि ५० हजारांचा रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाने कंत्राटी बस चालकांसाठी विशेष प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. कंत्राटदारांच्या बसच्या तपासणीवर भर दिला आहे. मात्र, या समस्येमुळे मुंबईकरांचा भाडेतत्वाच्या बसवरील आणि बेस्टवरील विश्वास कमी होत आहे.
अपघातातील मृतांची आकडेवारी
वर्ष – स्वमालकीच्या बस – भाडेतत्वावरील बस
२०२४-२५ – ०५ – १९
२०२५-२६ – ०३ – २१
बसचा एकूण ताफा – २,७९२
स्वमालकीच्या – २४९
भाडेतत्वावरील – २,५४३
