बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम म्हणजेच बेस्ट कर्मचाऱ्यांनीही आता आपल्याला गिरणी कामगारांप्रमाणे हक्काचे घर मिळावे, अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साकडे घातले आहे. बेस्ट ही देशातील सर्वांत मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठल्याही भागात बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर अशा विस्तारित उपनगरातही बेस्ट आपली सेवा पुरविते. या आस्थापनेमध्ये ३८ हजार कर्मचारी आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी साडेतीन हजार बसगाड्या धावत आहेत. काही वर्षांपासून शासनाने विविध कर्मचाऱ्यांना अल्पदरात घर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. गिरणी कामगार, पोलीस आणि इतर कर्मचारी यांना शासन स्तरावर निर्णय घेऊन राहत असलेल्या ठिकाणी मालकी हक्काची घरे देण्यात येत आहेत. पदपथावर राहणाऱ्यांनाही मोफत व सशुल्क घर दिले जाते. हेही वाचा >>> मुंबई : न्यायालयातच पोलीसाला मारहाण करणारा तरुण अटकेत सार्वजनिक प्रवास व्यवस्थेतील सुरक्षित प्रवास म्हणून बेस्टची ओळख आहे. काही कामगार वर्षानुवर्षे आपला वडिलोपार्जित वारसा म्हणून नोकरीचे सातत्य कायम टिकवून आहेत. काहींची तिसरी पिढी बेस्ट आस्थापनेमध्ये कार्यरत आहे. या बेस्ट कर्मचाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने त्यांना हक्काचे घर ते राहत असलेल्या वसाहतीत त्याच ठिकाणी देण्याचा निर्णय घेऊन हजारो कर्मचारी मुंबईबाहेर स्थलांतरित होण्यापासून वाचवावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मोफत न देता बाजारमूल्य आकारून दयावे, असे निवेदन बेस्ट वसाहतीतील कुटुंबीयांनी नियोजित गृहनिर्माण संस्थेमार्फत आमदार कालिदास कोळंबकर यांना दिले आहे.