मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) महत्त्वाकांक्षी अशा पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपुजनाची तारीख निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. उद्या, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एमएसआरडीसीच्या प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीत या दोन्ही प्रकल्पाच्या भूमिपुजनाची तारीख मुख्यमंत्र्यांकडून निश्चित केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने १६८ किमीचा पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याकरीता जालना-नांदेड असा १८० किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून कंत्राटदारांना कार्यादेशही देण्यात आले आहेत. कार्योदेश देऊन बरेच दिवस झाल्याने या प्रकल्पांचे भूमिपूजन केव्हा होणार आणि कामास सुरुवात केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता लवकरच भूमिपूजनाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एमएसआरडीसीची एक आढावा बैठक गुरुवारी घेणार आहेत. या आढावा बैठकीत पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड या दोन प्रकल्पाच्या भुमिपूजनाचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही यासंबंधीचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा…“म्हणून मी केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा

वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड महामार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी काही प्रमाणात भूसंपादन शिल्लक होते. ९० टक्के भूसंपादनाची प्रतीक्षा होती. त्यामुळे ९० टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून नव्या वर्षात या दोन्ही प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाईल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली होती. आता या भूमिपूजनाची तारीख उद्याच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी पश्चिमेकडील बाजूचे ९६ टक्के भूसंपादन झाल्याने भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन करत पश्चिमेकडील बाजूच्या कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील बाजूचे ८२ टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादनही लवकरच पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. जालना-नांदेडचेही भूसंपादन झाले आहे. तेव्हा या द्रुतगती महामार्गाच्या भूमिपुजनाचीही तारीख यावेळी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. याविषयी गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bhomi pojan date for msrdc ambitious pune ring road and jalna nanded expressway projects mumbai print news sud 02