Riddhi Thakkar Biker Accident in Chhattisgarh updates: मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथे राहणारी २४ वर्षीय बाईकर तरुणी रिद्धी ठक्करचे छत्तीसगडच्या बालोड येथे अपघाती निधन झाले आहे. बस्तरच्या डोंगराळ भागात २० बाईकर्सच्या समूहाबरोबर पर्यटनासाठी गेलेल्या रिद्धीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रिद्धी ठक्कर गेल्या अनेक वर्षांपासून दुचाकीवरून भारताच्या विविध राज्यात पर्यटनासाठी गेली होती.
सदर अपघात बुधवारी सकाळी ६ वाजता मारकोटला घाटात घडला. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून हे ठिकाण साधारण १०० किमी अंतरावर आहे. रिद्धीच्या बाईकची धडक एका अज्ञात अवजड वाहनाला झाल्यानंतर तिचा मृत्यू ओढवला. रिद्धीच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहनाने तिथून पळ काढला असून आरोपी चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती, बालोडचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली.
अपघातात रिद्धीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ती ज्या ग्रुपबरोबर गेली होती, त्यातील इतर दुचाकीस्वारांनी तात्काळ हेल्पलाईनला फोन करून रुग्णवाहिका मागवली आणि तिला जवळच्या कांकेर जिल्ह्यातील चरमा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढे तिच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी धमतारी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी ८.३० वाजता तिचा मृत्यू झाला.

कोण होती रिद्धी ठक्कर?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिद्धी ठक्कर बोरिवली पश्चिम येथे राहणारी होती. रिद्धी ठक्करला ओळखत असलेल्या व्यक्तीने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, रिद्धी ज्या ग्रुपसह गेली होती, त्यातील दुचाकीस्वार महाराष्ट्राच्या विविध भागातून आले होते. काही राज्याबाहेरचेही दुचाकीस्वार यात सामील झाले होते. हे सर्व लोक आपली यात्रा पूर्ण करून रायपूरला परत येत होते. रिद्धी बजाज एव्हेंजर दुचाकीवर स्वार होती.
रिद्धी ठक्कर गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शोभायात्रेतही तिच्या दुचाकीसह सहभागी होत होती. सोशल मीडियावरही ती आपल्या प्रवासाचे प्रत्येक अपडेट देत होती. @gearglimpse54 या तिच्या इन्स्टाग्राम हँडलला १८ हजार फॉलोअर्स आहेत. तिने मृत्यूपूर्वी तिच्या प्रवासाबाबतची पोस्ट शेअर केली होती. तसेच यूट्यूबवरही ती आपल्या प्रवासाचे व्लॉग करत होती.
जागृती होगाळेच्या आठवणी जागवल्या
रिद्धी ठक्करच्या मृत्यूमुळे २०१७ साली अपघातात निधन पावलेल्या जागृती होगाळेची यानिमित्ताने आठवण काढली जात आहे. रिद्धीप्रमाणेच ३५ वर्षीय जागृती होगाळे यादेखील बाईकर होत्या. वांद्र्यात राहण्यास असलेल्या जागृती होगाळे त्यांच्या ग्रुपसह पालघर जिल्ह्यात बाईकिंगसाठी गेल्या होत्या. डहाणू-जव्हार रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. खड्ड्यांमुळे तोल जाऊन त्यांची दुचाकी ट्रकखाली आली होती.

रिद्धीप्रमाणेच जागृती होगाळेही आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या बाईकिंगचा अनुभव शेअर करत होत्या. वेगळ्या क्षेत्रात आपला छंद जोपासणाऱ्या मुंबईतील दोन होतकरू तरुणींचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे बाईकर्स हळहळ व्यक्त करत आहेत.
