मुंबई : गेल्या १७ वर्षांपासून मुंबईतील जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारी देवनारमधील एसएमएस कंपनी लवकरच मुंबईबाहेर स्थलांतरित होणार आहे. सद्यस्थितीत अंबरनाथ येथील जांभिवली एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या नवीन प्रक्रिया प्रकल्पाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामांनाही वेग देण्यात आला आहे. न्यायालयाने कंपनीला स्थलांतरित होण्यासाठी जुलै २०२७ ची अंतिम मुदत दिली आहे. मात्र, त्या मुदतीपूर्वीच देवनारमधील प्रकल्प स्थलांतरित केला जाणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून कंपनीविरोधात लढा देणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्रातून दरदिवशी सुमारे १४ ते १६ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो. या संपूर्ण कचऱ्यावर देवनार येथील एसएमएस एन्वोक्लीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रक्रिया केली जाते. जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रकारानुसार त्याची वेगवेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. मात्र, कंपनीने २०१८ मध्ये हवा आणि जलप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला टाळे ठोकण्याचे आदेश दिले. त्या आदेशाविरोधात कंपनीने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने कंपनीला दिलासा दिला. त्यानंतर गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीने २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून प्रकल्पाच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे.

न्यायालयाने कंपनीच्या मागणीनुसार २०२५ मध्ये प्रकल्प स्थलांतरित करण्यासाठी २१ महिन्यांची मुदत दिली. ती मुदत जुलै २०२७ मध्ये संपुष्टात येणार आहे. देवनार येथील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या स्थलांतराचा आढावा घेण्यासाठी नुकतीच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीला एसएमएस एन्वोक्लीनचे दोन प्रतिनिधी उपस्थित होते. देवनारमधील विद्यमान जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प जांभिवली एमआयडीसी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. प्रस्तावित प्रकल्पाचे सुमारे ५० टक्के नागरी बांधकाम पूर्ण झाले असून काम निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू असल्याचा दावा कंपनीने केला. तसेच सुरू असलेल्या बांधकामाची छायाचित्रेही बैठकीत सादर करण्यात आली. नवीन प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची ऑर्डर देण्यात आली असून यंत्रसामग्रीच्या निर्मितीचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच मुंबईतील जैववैद्यकीय कचरा प्रक्रियेसाठी मुंबईबाहेर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन प्रकल्प प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबाबत पालिकेकडून विचारणा करण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या १५ जुलै २०२७ च्या मुदतीपूर्वीच साधारण मेपर्यंत नवीन सुविधा कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे एसएमएस कंपनीकडून सांगण्यात आल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मुळात नागरी वस्तीलगतची जागा जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी देणे हीच पालिकेची मोठी चूक आहे. कंपनीला जागा देण्यापूर्वी नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक होते. मात्र, पालिकेने कोणातेही मक विचारात घेतले नाही. पालिकेच्या चुकीमुळे हजारो नागरिकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत, असा आरोप गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष ॲड. फैयाज शेख यांनी केला. तसेच, तांत्रिक कारणे पुढे करून कंपनीला आणखी मुदतवाढ मिळू नये, यासाठी संबंधित प्राधिकरणांनी कंपनीला सहाय्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.

एमआयडीसीची दिरंगाई कायम; पालिका करणार मध्यस्थी

नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सर्व बाबींची पूर्तता करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समन्वयाने चाचणी घेण्याचे आदेश महापालिकेने कंपनीला दिले आहेत. दरम्यान, एमआयडीसीकडून आवश्यक पायाभूत सुविधा निर्धारित वेळेत उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचाही मुद्दा एसएमएस कंपनीच्या प्रतिनिधीने बैठकीत अधोरेखित केला. एमआयडीसीकडून २०२५ मध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे प्रकल्पास विलंब होत असल्याचा दावा कंपनीने केला होता. त्यावर न्यायालयाने कंपनीला २१ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. एमआयडीसीकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास होणाऱ्या विलंबाबाबत महापालिका एमआयडीसीकडे पाठपुरावा करून कामाला आणखी गती देणार आहे.

प्रकरण नेमके काय ?

महापालिकेने २० वर्षांच्या करारावर जागा उपलब्ध करून दिल्यानंतर २००९ मध्ये कंपनीची सुरुवात झाली. त्यावेळी तेथील स्थानिक रहिवासी कंपनीबाबत अनभिज्ञ होते. मात्र कालांतराने २४ तास चिमणीतून बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराने स्थानिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी या कंपनीबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या. दरम्यान, कंपनीने अनेक वेळा जल आणि वायुप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१९ मध्ये कंपनीला टाळे ठोकण्याचे आदेश दिले. त्या आदेशाविरोधात कंपनीने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयानेही कंपनीला दिलासा दिला. त्यानंतर गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीने २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. देवनार – गोवंडीतील नागरिकांना वायू प्रदूषणामुळे क्षयरोग, फुफ्फुसाचे रोग अन्य श्वसनाचे विकार होत असल्याचेही आरोप संस्थेने केले. त्यानंतर एसएमएस कंपनीचा प्रक्रिया प्रकल्प लोकवस्तीपासून दूर मुंबईबाहेर हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तेव्हापासून स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे.

कचऱ्यावर अशी होते प्रक्रिया

जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रकारानुसार त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. घातक कचरा इन्सिनरेटरमध्ये उच्च तापमानावर जाळला जातो. पुनर्वापरयोग्य कचऱ्याचे ऑटोक्लेव्हमध्ये वाफेच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण केले जाते. काचेच्या कचऱ्यावर रसायनांच्या साहाय्याने प्रक्रिया केली जाते, तर प्लास्टिक कचऱ्याचे श्रेडिंग करून त्याचे छोटे तुकडे केले जातात. प्रक्रिया केलेला कचरा पुढे अधिकृत पुनर्वापरासाठी पाठविण्यात येतो.