मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून या घोटाळ्यातील सहभागी सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी दुसऱ्यांदा मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर रितू तावडे यांची भेट घेतली. संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी यावेळी केली. सर्व बनावट प्रमाणपत्र पोर्टलवरून काढण्याचे आदेश महापौरांनी दिले.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म

प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी केले होते. या प्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यामध्ये देवनार, मानखुर्द, गोवंडी या भागात खोट्या दस्तावेजाच्या आधारे सर्वाधिक जन्म प्रमात्रपत्र दिल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ताबडतोब महापौरांची भेट घेऊन याप्रश्नी बैठक आयोजित करायला लावली होती. तेव्हापासून हा जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या घोटाळ्याचा विषय गाजतो आहे. त्यातच सोमवारी ४ मे रोजी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनीही महापौरांना पत्र पाठवून या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना निलंबन करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी किरीट सोमय्या यांनी दुसऱ्यांदा पालिका मुख्यालयात रितू तावडे यांची भेट घेतली. महापौरांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या ⁠२६ विभाग कार्यालयांमधून बेकायदेशीररित्या ८७ हजार ३४७ जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली असून ही प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. या प्रकरणी त्यांना पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. या बैठकीला आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश भांदिर्गे, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, पोलिस अधिकारी व राज्य सरकारचे अधिकारीही उपस्थित होते.

जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात बांगलादेशी ; सोमय्यांचा आरोप

खोट्या दस्तावेजाच्या आधारे चुकीची जन्म नोंदणी प्रमाणपत्रे प्राप्त करण्याच्या गुन्ह्यांच्या तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. या गुन्ह्यांच्या तपासादम्यान व इतर प्राप्त तक्रारींवरून अशा पद्धतीन प्राप्त करण्यात आलेल्या जन्म नोंदणी प्रमाणपत्रांची संख्या मोठी असल्याचे आढळून आले आहे. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यातील सर्वात जास्त नोंदी या भायखळा, कुर्ला, गोवंडी, कुर्ला, देवनार, मानखुर्द या भागातील असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

विशेष तपास पथक

या विषयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे या गुन्ह्यांचा व प्राप्त तक्रारींचा प्रभावी व सखोल तपास करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. या पथकात सह आयुक्त (गुन्हे) यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलिस आयुक्त गुन्हे, अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा, पोलिस उपआयुक्त प्रकटीकरण, गुन्हे शाखा या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली.