मुंबई : विकास प्रकल्पांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी मध्य वैतरणा धरणासाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात बीड जिल्ह्यात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. बीड जिल्ह्यातील १३ गावांमध्ये ५४० हेक्टर क्षेत्रावर लावण्यात आलेली दोन लाख झाडे ठाकरे बंधूंनी जनतेला दाखवावीत, असे आव्हान अमित साटम यांनी दिले. पर्यावरणाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.
कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पातील वृक्षतोडीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना साटम यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. पर्यावरणाच्या नावाखाली ठाकरे बंधू आणि काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असून अराजकता पसरवण्याचे काम करत आल्याचा आरोप साटम यांनी केला. मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता असताना मध्य वैतरणा धरणासाठी वृक्षतोड करण्यात आली होती. त्याच्या बदल्यात बीड जिल्ह्यातील १३ गावांमध्ये दोन लाख झाडे लावण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, प्रत्यक्षात तिथे झाडे लावण्यात आली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत ठाकरे बंधूंनी बीडमध्ये जाऊन जनतेला केलेली वृक्षलागवड दाखवावी, असे साटम म्हणाले.
शाश्वत विकास ही भाजपची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्प तीन हजार मेगावॅट क्षमतेचा असून ३७७ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून स्वच्छ ऊर्जानिर्मिती होणार असल्याचा दावा त्यांनी केला. एवढीच वीज औष्णिक प्रकल्पातून निर्माण करायची झाल्यास मुंबईच्या १५ पट जागा आणि २८ कोटी झाडांची गरज भासेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भारत जगातील चौथी आर्थिक महासत्ता झाला आहे. अनेक बड्या राष्ट्रांना भारताचे यश खुपते आहे. त्यामुळे कोणताही नवा प्रकल्प देशात उभा राहत असेल तर परदेशी मदतीच्या जोरावर शहरी नक्षलवादी त्याला विरोध करतात. आता त्यामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा गट आणि काही अभिनेते सामील झाले आहेत, असाही आरोप आमदार साटम यांनी केला. तसेच, गेल्या दहा वर्षांत देशातील आणि महाराष्ट्रातील वृक्ष आच्छादनात वाढ झाली आहे. जगाची पंप स्टोरेज पॉवर क्षमता २०१ गीगावॅट झाली आहे. चीन, जपानने त्यात मोठी गती घेतली असून भारताची क्षमता केवळ ७.४३ गीगावॅट असल्याचे साटम यांनी सांगितले.
