मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०१९ मध्ये वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जी ब्लॉक’ ते चुनाभट्टी उड्डाणपुलाचे आता नामकरण करण्यात येणार आहे. या पुलाला स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी नामकरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

बीकेसीतून पूर्व द्रुतगती महामार्गावर येण्यासाठी वा पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसीत येण्यासाठी वाहनचालकांना बीकेसी जंक्शनवरून पुढे धारावी, शीवमार्गे पूर्व द्रुतगती महामार्गावर जावे लागत होते. तसेच सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता मार्गेही जाण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, यात वेळेचा अपव्यय होऊन प्रवाशांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बीकेसीतून थेट पूर्व द्रुतगती महामार्गावर अतिजलद जाता यावे, यासाठी ‘एमएमआरडीए’ने बीकेसी ते चुनाभट्टी असा १.६ किमी लांबीचा आणि अंदाजे २६१ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला.

या प्रकल्पास २०१४ मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली. नोव्हेंबर २०१९ मध्ये काम पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे बीकेसीतून अवघ्या काही मिनिटांत पूर्व द्रुतगती महामार्गावर पोहोचणे शक्य झाले. या उड्डाणपुलाला आजघडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दूरदृश्य प्रणालीद्वारे नामकरण

या उड्डाणपुलाला माजी मुख्यमंत्री बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे नाव देण्याची मागणी होत होती. ही मागणी मान्य करून एमएमआरडीएने पुलाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर एका कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे पुलाच्या नामकरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल ‘स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल’ या नावाने ओळखला जाईल.