मुंबई : महानगरपालिकेच्या ‘बी’ विभागाअंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि डोंगरी परिसरातील ९ अनधिकृत दुकाने, रस्त्यावर लावलेले लोखंडी खांब, दुकानांचे अनधिकृत नामफलक तसेच इतर अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘बी’ विभागाकडून नुकतीच निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
‘बी’ विभागातील वल्लभभाई पटेल मार्ग आणि डोंगरी परिसरात अनधिकृत दुकाने आणि पदपथावर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभाग कार्यालयाअंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन या विभागांनी संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली. उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, ९ अनधिकृत दुकाने, पदपथावरील अतिक्रमण, दुकानांचे अनधिकृत वाढीव बांधकाम, रस्त्यावर लावलेले लोखंडी खांब, दुकानांचे अनधिकृत नामफलक हटविण्यात आले. दरम्यान, परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
‘बी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन, अनुज्ञापन व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. डोंगरी पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
