मुंबई : डेंगी, हिवताप यासारख्या कीटकजन्य साथीच्या आजारांना आळा बसावा आणि त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी महापालिकेने डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरोघरी, तसेच घरांच्या आसपासच्या परिसराची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत सुमारे ३२ लाख घरांची तपासणी करण्यात असून सुमारे ३० लाख घरांच्या परिसरात धूम्रफवारणी करण्यात आली. तसेच, तब्बल २२ हजारहून अधिक परिसरांना भेट देऊन तेथील ४२ हजार ३२९ डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात महापालिकेला यश आले.

पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाने धूम्रफवारणी मोहीम हाती घेतली आहे. तसेच, कीटकनाशक विभागाच्या पथकांनी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणण्यावर विशेष भर दिला आहे. जानेवारी २०२६ ते २७ मे २०२६ या साधारणत: ५ महिन्यांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून एकूण २२ हजार ८० परिसर भेटी देण्यात आल्या. तसेच, ३२ लाख ५१ हजार ६२३ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३० लाख १७ हजार २२० घरांच्या परिसरात धूम्रफवारणी करण्यात आली आहे.

या मोहिमेदरम्यान ३७ हजार ८०० ठिकाणी डेंगी प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस एजिप्ती’ डासांच्या अळ्या; तर ४ हजार ५२९ ठिकाणी हिवताप (मलेरिया) वाहक ‘ऍनॉफिलीस स्टिफेन्सी’ डासांच्या अळ्या आढळून आल्या. ही डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्याने ही कार्यवाही केली. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार कीटकनाशक खात्यातील कामगार – कर्मचारी, अधिकारी नियमितपणे तपासणी करत आहेत. तसेच, अश्विनी भिडे शहर व उपनगरातील विविध ठिकाणच्या पाहणी दौऱ्यात कीटकनाशक चौक्यांना विशेष भेटी देत असून कामकाजाचा आढावा घेत आहेत.

कीटकनाशक खात्यातील साधारणपणे १ हजाराहून अधिक कामगार – कर्मचारी, अधिकारी हे अव्याहतपणे कार्यरत असून ते मुंबईच्या कानाकोपऱ्यातील विविध भागांचे आणि इमारतींच्या परिसरांचे नियमितपणे सर्वेक्षण आणि तपासणी करीत आहेत. या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर आणि टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या आणि त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांमधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात आली आहे. डासांची संभाव्य उत्पत्ती स्थळे ठरू शकणारे ५४० टायर्स आणि १ लाख १६ हजार २५१ अडगळीतील वस्तूंचे निष्कासन करण्यात आले. तसेच मुंबईत सुरू असणाऱ्या चार हजार इमारत पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा अधिकाऱ्यांना डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती अश्विनी भिडे यांनी दिली.

मुंबईत विविध रोगांवर नियंत्रण असावे आणि रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून सार्वजनिक आरोग्य खाते, कीटकनाशक खाते यासारखे महानगरपालिकेचे विविध विभाग अविरतपणे कार्यरत आहेत. औषध फवारणी, धूम्र फवारणी, डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे, यासारख्या विविध उपाययोजना देखील महानगरपालिकेतर्फे नियमितपणे करण्यात येत आहेत, असे भिडे यांनी नमूद केले.