मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अँटॉप हिल प्रसूतिगृहात प्रसूतीनंतर दाखल झालेल्या महिलांना सकस आणि योग्य आहार पुरविण्यात रुग्णालय प्रशासन अपयशी ठरले आहे. मागील तीन वर्षांपासून या प्रसूतिगृहामध्ये दाखल होणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांना घरूनच जेवण आणण्यास सांगण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

गर्भवती महिलांची पसूती सुरळीत व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने शहरामध्ये ३० प्रतूतिगृहे उभारली आहेत. या प्रसूतिगृहांना महिलांकडून प्राधान्य दिले जाते. यामुळे केईएम, शीव, नायर व कूपरसारख्या मोठ्या रुग्णालयांमधील प्रसूतीचा ताण कमी होण्यास मदत होते. मात्र प्रसूतिगृहामध्ये अद्ययावत सोयी-सुविधा पुरविण्याकडे मुंबई महानगरपालिकेकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात येते. प्रसूतिगृहामध्ये दाखल होणाऱ्या महिलांना प्रसूतीनंतर सकस व पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक असतो. हा आहार पुरविण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. यामध्ये महिलांना दोन वेळेचे जेवण, सकाळचा नाष्टा यांचा समावेश असतो. मात्र अँटॉप हिल येथील शशिकांत सावंत प्रसूतिगृहामध्ये दररोज किमान १० ते १५ महिला दाखल होत असतात. या महिलांना सकस व पौष्टिक आहार पुरविण्याची प्रशासनाची जबाबदारी असतानाही मागील तीन वर्षांपासून रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांना आवश्यक आहारच दिला जात नसल्याचे उघडकीस आले आहे. महिलांना पौष्टिक व सकस आहार मिळत नसल्याने त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर व पर्यायाने नवजात बालकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे.

प्रसूतिगृह प्रशासनाकडून महिलांना पौष्टिक व सकस आहार मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरातून जेवण आणावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री जेवण पोहचवताना धावपळ होत आहे. मागील तीन वर्षांपासून महिलांना जेवण, नाष्टा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी

अँटॉप हिल येथील शशिकांत सावंत प्रसूतिगृहामध्ये महिलांना आहार पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. हा प्रकार फारच गंभीर असून, यामुळे रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, प्रसूती महिलांना नियमित व पौष्टिक आहार उपलब्ध करून द्यावा तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेनेच्या (शिंदे) युवती सेनेच्या भायखळा विधानसभा अध्यक्ष व कस्तुरबा रुग्णालयाच्या दक्षता समिती सदस्य श्रद्धा वाघमारे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवदेनाद्वारे केली आहे.

प्रशासनाचे म्हणणे

प्रसूतिगृहामध्ये महिला जेवण पुरविण्यासाठी मागील दीड वर्षापासून कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलली जात होती. त्यामुळे महिलांना जेवण पुरवणे शक्य होत नव्हते. मात्र आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, पुढील एक ते दीड महिन्यांमध्ये महिलांना सकस व पौष्टिक आहार मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.