मुंबई : मुंबई महापालिकेत गुरुवारी सहाय्यक आयुक्तांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या. सहा सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या तर तीन कार्यकारी अभियंत्यांना सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. एका सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त पदावर बढती देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या बदल्या केल्या.
मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचा कार्यालयीन आदेश ३० जुलै रोजी जारी केला. हा आदेश त्याच दिनांकापासून वा अधिकारी पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून लागू होईल. गिरगाव, मुंबादेवीचा भाग असलेल्या ‘सी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांची बदली देवनार गोवंडीचा समावेश असलेल्या ‘एम’ पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावर करण्यात आली.
तर ‘सी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी कार्यकारी अभियंता सुनील माने यांची नियुक्ती करण्यात आली. करनिर्धारण आणि संकलक विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांना मालमत्ता विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी नेमण्यात आले आहे. तर मालमत्ता विभागाचे सध्याचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांची उपायुक्त पदी बढती करण्यात आली आहे.
अन्य बदल्या …
– स्वप्नजा क्षीरसागर (सहाय्यक आयुक्त – जी/दक्षिण विभाग) यांची नियुक्ती ‘सहाय्यक आयुक्त (जी/दक्षिण विभाग)’ याच पदावर कायम ठेवून त्यांच्याकडे ‘करनिर्धारक व संकलक’ पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
– उज्वल इंगोले (सहाय्यक आयुक्त – एम/पूर्व विभाग आणि ‘सहाय्यक आयुक्त – अतिक्रमण निर्मूलन, पूर्व उपनगरे’ पदाचा अतिरिक्त कार्यभार) यांची ‘सहाय्यक आयुक्त (ए विभाग)’ या पदावर बदली झाली आहे.
– योगिता कोल्हे (सहाय्यक आयुक्त – टी विभाग) यांची ‘सहाय्यक आयुक्त (टी विभाग)’ या पदावरच पदस्थापना कायम ठेवली असून त्यांच्याकडे ‘सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) पूर्व उपनगरे’ या पदाचा अतिरिक्त कार्यभार अनुज्ञेय कार्यभार भत्त्यासह सोपवला आहे.
– सुनिल माने (कार्यकारी अभियंता, मुख्य कामे जलकामे, जल अभियंता खाते) यांच्याकडे ‘सहाय्यक आयुक्त (सी विभाग)’ या पदावर पूर्णकालिक कार्यभार देण्यात आला आहे, तसेच त्यांच्याकडे ‘सहाय्यक आयुक्त (बाजार विभाग)’ या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
– वनिता कोकाटे (कार्यकारी अभियंता) यांची ‘सहाय्यक आयुक्त (के/दक्षिण विभाग)’ या पदावर बदली झाली आहे.- जयदीप मोरे (कार्यकारी अभियंता, घन कचरा व्यवस्थापन खाते) यांच्याकडे ‘सहाय्यक आयुक्त (एन विभाग)’ या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
