मुंबई : महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राद्वारे ”जन्म व मृत्यू नोंदणी” पोर्टलचा वापर करून जन्म, मृत्यू नोंदणी व दुरूस्तीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. या सुविधेनुसार जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्र नोंदणी नंतर अवघ्या ३ कार्यालयीन दिवसात उपलब्ध होणार आहे. तसेच जन्म प्रमाणपत्रात बालकाचे नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विवाह प्रमाणपत्रातील दुरूस्ती अवघ्या तीन दिवसात करण्यात येणार आहे. तसेच जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रातील दुरूस्त्या २५ कार्यालयीन दिवसात करण्यात येणार आहेत.

जन्म प्रमाणपत्रात बालकाचे नाव समाविष्ट करणे, बाळाच्या जन्म प्रमाणपत्रातील आई – वडिलांच्या नावात , मूळ व तात्पुरता पत्त्यात , तारीख, लिंग आदीसारख्या दुरूस्तीसाठीचे अर्ज आता करता येणार आहेत. मृत्यू प्रमाणपत्रातील दुरूस्ती, क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्रात रूपांतर, विवाह प्रमाणपत्र दुरूस्ती यासारख्या दुरूस्तीचेही अर्ज स्विकारण्यात येत आहेत. जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रातील विविध प्रकारच्या विहित कालावधीत म्हणजे २५ कार्यालयीन दिवसात या प्रमाणपत्रातील दुरूस्त्या करून देण्यात येणार आहेत. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी विविध प्रकारच्या अर्ज प्रक्रियेबाबत माहितीपर फलक लावण्यात येत आहेत.

नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी अर्ज स्थितीच्या माहितीबाबत नागरिकांना ”युनिक आयडी”च्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करता येईल. अर्जासोबतच्या पोचपावतीवर युनिक आयडी नमुद करण्यात आला आहे. नागरीकांना जन्म आणि मृत्यूच्या प्रमाणपत्रातील दुरूस्तीच्या अनुषंगाने पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज स्विकृतीची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. अर्ज स्विकृतीची सुविधा अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, याअनुषंगाने नागरी सुविधा केंद्र परिसरात माहितीपर फलक लावण्याची कार्यवाही तसेच याबाबत नागरिकांना पुरेशा प्रमाणात माहिती व्हावी, यासाठी अधिक जनजागृती करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिल्या.

जुन्या प्रमाणपत्राचे नवीन क्युआर कोड आधारित प्रमाणपत्रामध्ये रूपांतर

जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्राचे नवीन क्युआर कोड आधारित प्रमाणपत्रामध्ये रूपांतर करण्याच्या अर्ज स्विकृतीसाठी नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून दिली आहे. जुन्या दाखल्याची उपलब्धता आणि महानगरपालिकेच्या विभाग स्तरीय नोंदींमध्ये पडताळणीच्या आधारे ”क्यूआर कोड”युक्त प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल. क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र बनविण्याच्या अर्जासाठी जन्म, मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत उपलब्ध करून द्यावी लागेल. तसेच महानगरपालिकेकडे असणाऱ्या दस्तावेजाची नोंद आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.साधारणपणे २५ कार्यालयीन प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.