मुंबई: मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची आता बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी नोंदवली जाणार आहे. त्यासाठी भाजपच्या पक्ष कार्यालयात यंत्र बसवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे नगरसेवक वेळेत सभागृहात पोहोचू न शकल्यामुळे भाजपला नामुष्की पत्करावी लागली होती. विरोधकांनी संख्याबळाच्या आधारे प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र भाजपचे नगरसेवक सभागृहात अनुपस्थित असल्यामुळे भाजपला बहुमत असूनही संख्याबळात हार पत्करावी लागली होती. अशी वेळ परत येऊ नये म्हणून पक्षाने विशेष खबरदारी घेतली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत सर्वाधिक, ८९ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीची महापालिकेत सत्ता आहे. मात्र गेल्या आठवड्यात कामकाजात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाच चितपट केले.

‘तातडीचे कामकाज’ म्हणून आणलेला प्रस्ताव विरोधकांनी बहुमताने फेटाळला. पक्षादेश काढलेला असतानाही नगरसेवक वेळेत न पोहोचल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढवली. विरोधकांनी एकजूट दाखवून तातडीच्या कामकाजाला संख्याबळाने विरोध केला. वडाळ्यातील एक भूखंड विकासकाला देण्याबाबतच्या प्रस्तावासह तातडीचे कामकाज म्हणून आणलेले प्रस्ताव सत्ताधाऱ्यांना बाजूला ठेवावे लागले. महासभेच्या पटलावरचा हा पराभव सत्ताधारी भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सभागृह नेते गणेश खणकर यांनी सर्व ८९ नगरसेवकांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला. मात्र अशी वेळ परत येऊ नये, नगरसेवकांना शिस्त लागावी म्हणून भाजपने आता पक्ष कार्यालयातच यांत्रिक पद्धतीने नोंदणी करणारे यंत्र बसवले आहे.

याबाबत सभागृहनेते गणेश खणकर यांनी सांगितले की, बायोमेट्रीक हजेरीमुळे नगरसेवक किती वाजता आले किती वाजता गेले याची पूर्ण नोंद दरदिवशी मिळणार आहे. अनेक नगरसेवक उशीरा आले की थेट सभागृहात जातात किंवा तिथूनच घरी निघून जातात. मात्र कार्यालयात येऊन हजेरी नोंदवणे हे यापुढे सक्तीचे करण्यात आले असल्याचेही खणकर यांनी सांगितले.

समित्यांवर समसमान संख्याबळ

मुंबई महापालिकेच्या सर्वच समित्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ अगदीच समसमान आहे. त्यात किमान एक अंकाचा तरी फरक राहावा म्हणून राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनाही महायुतीने जवळ केले. त्यामुळे सर्व समित्यांमध्ये सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ केवळ एकने जास्त आहे. समित्यांमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सर्व सदस्यांना प्रत्येक सभेला उपस्थित राहावेच लागते. तसेच संपूर्ण सभा संपेपर्यंत थांबावे लागते. त्यात गफलत होऊ नये म्हणून भाजपने विशेष खबरदारी घेतली आहे.

सर्व नगरसेवकांच्या हजेरीचा प्रयत्न बारगळला

काही वर्षांपूर्वी प्रशासनाने सर्व नगरसेवकांच्या बायोमेट्रीक हजेरीचा प्रस्ताव आणला होता. अनेक नगरसेवक सभागृहात न बसता हजेरीपटावर स्वाक्षरी करून पळ काढतात. त्यामुळे अशा नगरसेवकांना रोखण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र अशी हजेरी कधीच सुरू झाली नाही.