मुंबई : मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने हाती घेतलेल्या तीन प्रकल्पांच्या खर्चात गेल्या सहा महिन्यांत तब्बल २४ ते ९३ टक्के वाढ झाली आहे. भायखळा ते जे.जे. उड्डाणपुलाला जोडणारा पूल, कुर्ला – घाटकोपर उड्डाणपूल, शीव – पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल या तीन उड्डाणपुलांच्या खर्चात वाढ झाली आहे. या तीन प्रकल्पांच्या खर्चात गेल्या सहा महिन्यात एकूण ६६ टक्के वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला असून त्यातून ही बाब उघड झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने मुंबईत विविध पुलांची कामे हाती घेतली आहेत. पुलांची किरकोळ दुरुस्तीची, पुनर्बांधणी आणि मोठ्या संरचनात्मक दुरुस्तीची कामे मुंबई महापालिकेने हाती घेतली आहेत. एकूण १०१ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी तीन पुलांच्या कामांच्या खर्चात अवघ्या सहा महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. हे तीन पूल शहर आणि पूर्व उपनगरातील आहेत. या तीन प्रकल्पांमध्ये भायखळा ते जेजे उड्डाणपूलाला जोडणारा पूल, कुर्ला – घाटकोपर उड्डाणपूल, शीव – पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल यांचा समावेश आहे. तीन उड्डाणपुलांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत होती, तेव्हा या प्रकल्पांचा एकत्रित खर्च ४०१३ कोटी रुपये होता. तर आगामी अर्थसंकल्पात या प्रकल्पांचा खर्च वाढलेला दाखवण्यात आला आहे. या प्रकल्पांचा सुधारित अंदाजित खर्च ६६७५ कोटी दाखवण्यात आला आहे. या तीन प्रकल्पांच्या खर्चात २४ ते ९३ टक्के वाढ झाली आहे. तर एकूण वाढ ६६ टक्के आहे.

आरेखनातील बदल, जीएसटीतील वाढ आणि तसेच उपयोगिता वाहिन्या हटवण्याच्या कामामुळे आणि आकस्मिक आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पांचा खर्च वाढल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भायखळा येथील इंग्रजी वाय अक्षराचा आकाराचा पूल जे. जे. उड्डाणपुलाला जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खर्चात ९३ टक्के वाढ केली आहे. या प्रकल्पासाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८०५ कोटी होता. या प्रकल्पाच्या आरेखनात बदल करण्यात आला असून हा पूल पुढे लालबाग पुलाला जोडण्याचा विचार आहे. त्यामुळे हा खर्च वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पूर्व उपनगरांतील कुर्ला येथील कल्पना टॉकीज ते घाटकोपरदरम्यान लाल बहादूर शास्त्री मार्गावर उभारण्यात येणाऱ्या कुर्ला – घाटकोपर उड्डाणपुलाच्या खर्चातही ९३ टक्के वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या सुधारित खर्चात वस्तू व सेवा कर यांचा समावेश आहे. तसेच उपयोगिता वाहिन्या स्थलांतरित करण्याच्या खर्चामुळे यात वाढ झाली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शीव – पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खर्चात २४ टक्के वाढ झाली आहे. सुरुवातीला पुलाचे बांधकाम खांबांवर केले जाणार होते. मात्र हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बांधण्यात येणार असून एका बाजूला खांब उभारण्यास प्राधिकरणाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हा पूल अधांतरी स्वरुपाचे तंत्रज्ञान (कॅण्टीलिव्हर) वापरून उभारावा लागणार आहे. त्यामुळे पुलाच्या बांधणीत स्टीलचे प्रमाण वाढले आहे. तसेच पुलाची उंचीही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे खर्च वाढल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोणत्या प्रकल्पात किती वाढ

– भायखळा – जे.जे. उड्डाणपूल यांना जोडणारा केबल-स्टे पूल

लांबी: ८५० मीटर

सुरुवातीचा खर्च: ८०५ कोटी

आताचा खर्च: १,५६१ कोटी

वाढ: ९३.९१ टक्के

– कुर्ला–घाटकोपर उड्डाणपूल

लांबी: ४.२५ किमी

सुरुवातीचा खर्च: १,६३५ कोटी

आताचा खर्च: ३,१५६ कोटी

वाढ: ९३ टक्के

– शीव – पनवेल महामार्गावरील टी-जंक्शन उड्डाणपूल

लांबी: १.९३ किमी व

सुरुवातीचा खर्च: १,५७३ कोटी

आताचा खर्च: १,९५८ कोटी

वाढ: २४.४७ टक्के

एकूण स्थिती:

निविदेच्यावेळी तीन प्रकल्पांचा एकत्रित खर्च: ४,०१३ कोटी

सुधारित अंदाजित खर्च: ६,६७५ कोटी

एकूण वाढ: सुमारे ६६.३ टक्के