मुंबई : मुंबई महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर होण्यास यंदा निवडणुकीमुळे तब्बल एक महिना उशीर झालेला असताना या अर्थसंकल्पावरील चर्चाही लांबत आहे. अर्थसंकल्प उशीरा मंजूर झाल्यास प्रभाग स्तरावरील कामासाठीचा निधी मिळण्यास विलंब होणार असून प्रभाग स्तरावरील कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्यास नगरसेवकांना घाई करावी लागणार आहे.
श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर होण्यास यंदा प्रथमच उशीर झाला आहे. दरवर्षी ४ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प यंदा निवडणुकांमुळे २० दिवस उशीराने स्थायी समितीला सादर झाला. त्यानंतर अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये चर्चा सुरू होती. अर्थसंकल्पावरील भाषणांनंतर ६ एप्रिलला स्थायी समितीने या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर हा अर्थसंकल्प पालिका सभागृहात मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला.
अर्थसंकल्पावर १५ एप्रिलपासून सभागृहात चर्चा सुरू आहे. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून लांबत असून आता अर्थसंकल्प कधी मंजूर होणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प मंजूर होत नाही तोपर्यंत प्रभाग स्तरावरील कामांसाठीचा १ कोटी रुपये निधीही वापरता येणार नाही. त्यामुळे लादीकरण, शौचालयांचे दरवाजे लावणे अशा नागरी सेवा – सुविधांची कामेही करता येणार नाहीत. १ मेपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करण्याचे सत्ताधाऱ्यांचे उद्दिष्ट्य असले तरी त्यानंतर प्रभाग स्तरावरील कामे पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीचा केवळ महिन्याभराचा कालावधी मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असून आता तब्बल ५१ नगरसेवक यावर चर्चा करणार आहेत. आतापर्यंत केवळ ४० नगरसेवकांची भाषणे झाली आहेत. अर्थसंकल्पावर बोलण्यास नगरसेवकांना वेळेचे बंधन नाही. त्यामुळे ही चर्चा खूप दिवस चालते. मात्र यावेळी आधीच अर्थसंकल्प मांडण्यास उशीर झालेला आहे. त्यातच विविध कारणामुळे सभा रद्द होतात, तर कधीकधी मानापमानाच्या नाट्यात सभा तहकूब केली जाते. त्यामुळे ही चर्चा लांबत आहे. या सगळ्यामुळे अर्थसंकल्प मंजूर कधी होणार याबाबत साशंकता आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले की, अर्थसंकल्प मंजूर होण्यास उशीर झाल्यास प्रभाग स्तरावरील निधी मिळण्यासही उशीर होणार आहे. त्यानंतर प्रभागातील कामांचे अंदाजपत्रक तयार करणे त्याला मंजुरी घेणे आणि प्रत्यक्ष कामाला सुरूवात करणे या सगळ्याला विलंब होणार आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी नागरी सुविधांची कामे कशी होणार हा खरा प्रश्न आहे.
दरम्यान, याबाबत पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावेळी अर्थसंकल्प उशीरा मंजूर होत असला तरी ६० लाखांचा नगरसेवक निधी वितरित झाला आहे. केवळ प्रभाग स्तरावरील कामांचा १ कोटींचा निधी आणि विकासनिधी मात्र सभागृहाच्या मान्यतेनंतरच मिळू शकणार नाही.
यावेळी अर्थसंकल्पाची प्रक्रिया उशीरा सुरू झाली, तसेच यावेळी अर्थसंकल्प मंजूर करण्यास कालमर्यादा नाही. पुढच्या आठवड्यात अर्थसंकल्प मंजूर होईल. प्रभाग स्तरावर अंदाज पत्रके तयार असतात. त्यामुळे कामांना वेळ होणार नाही. विशेष फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.
