मुंबई : मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल ८०,९५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाची खर्चाची बाजूही शुक्रवारी महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आली. हा अर्थसंकल्प महानगरपालिका सभागृहात मंजूर होताच सॅप प्रणालीद्वारे विकासकामांसाठी निधी तत्काळ उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे आता प्रभागांतील विकासकामांना गती मिळणार आहे. मात्र पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे अवघे पंधरा – वीस दिवसच कामासाठी मिळणार आहेत.

मुंंबई महानगरपालिका प्रशासनाने मांडलेले २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका सभागृहात सुचवलेल्या सुधारणांसह शुक्रवारी ८ मे रोजी मंजूर झाले. स्थायी समितीने नगरेसवकांना विकासकामांसाठी दिलेला निधी, महापौर विकास निधीतून वितरीत झालेला निधी याबाबतचा फेरफार करून अद्ययावत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. नगरसेवकांना विकास कामांसाठी द्यावयाचा निधी महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ सॅप प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये आणि महानगरपालिका सभागृहात नगरसेवकांनी सुचवलेल्या नागरी सेवा – सुविधा आणि स्थानिक विकास कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

यंदा जानेवारी २०२६ मध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची तसेच पाठोपाठ विविध वैधानिक, विशेष आणि समित्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. त्यादरम्यान महानगरपालिका प्रशासनाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्थिक वर्ष २०२६-२०२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज सादर केले. विहित प्रक्रियेनुसार अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये चर्चा झाली. चर्चेदरम्यान आवश्यक त्या सुधारणा करून स्थायी समितीने सुधारित अर्थसंकल्प महानगरपालिका सभागृहात मांडला. दरवर्षी १ एप्रिलला अर्थसंकल्प लागू होत असला तरी यंदा या अर्थसंकल्पाला उशीर झाल्यामुळे विकास निधी कधी मिळणार आणि कामे कधी सुरू होणार अशी चिंता नगरसेवकांना होती. मात्र आता या निधीचे वितरण झाले आहे.

आजवरच्या नियमित प्रक्रियेनुसार अर्थसंकल्प आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मंजूर होणे अपेक्षित असते. यंदा निवडणुका व त्यानंतरच्या प्रक्रियांमुळे अर्थसंकल्प मंजुरीस अधिक कालावधी लागला. त्यामुळे महानगरपालिका सदस्यांनी सुचविलेल्या स्थानिक विकासकामांना गती देण्याची आवश्यकता पाहता, सुधारणा झालेला अर्थसंकल्प तत्काळ कार्यान्वित करणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार सुधारणांचा अर्थसंकल्प सॅप (SAP) प्रणालीवर तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या वित्त विभागाने शुक्रवार, ८ मे रोजी रात्री उशिरापर्यंत कार्यरत राहून सॅप प्रणालीवर सुधारीत अर्थसंकल्प अपलोड केला. महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या या तत्पर कार्यवाहीमुळे मुंबईतील विविध स्थानिक विकासकामांना गती मिळणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला.