मुंबई : देशातील श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ८० हजार ९५२ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. पुढील आर्थिक वर्षातील विकास कामांसाठी आगामी अर्थसंकल्पात ४८ हजार १६४ कोटी २८ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पात वित्तीय विवेक, पायाभूत सुविधा – विश्वास आणि भविष्य उभारणी, आरोग्य व शिक्षणामध्ये गुंतवणूक, हरित भविष्यासाठी शाश्वतता, आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्ज, व्यवसाय सुलभता व सामाजिक उपक्रम, प्रशासकीय कार्यक्षमता या बाबींवर भर देण्यात आल्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले आहे.

मुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आला. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे गेली तीन वर्षे महानगरपालिका आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांमार्फत अर्थसंकल्प सादर केला जात होता. मात्र मागील तीनही वर्षांचे अर्थसंकल्प चर्चेविनाच मंजूर झाले होते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून भूषण गगराणी यांनी तब्बल चार वर्षानंतर बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात जुन्याच कामांना प्राधान्य देण्यात आले असून वेसावे दहिसर व दहिसर भाईंदर सागरी किनारा मार्गासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मलनिःसारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, आरोग्य, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास गलिच्छ वस्ती सुधारणा आदींसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान सुमारे ८.७७ टक्केने वाढले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचे आकारमान वाढत असूनअसून २०२४-२५ मध्ये अर्थसंकल्पाचे आकारमान ६५ हजार १८० कोटी ८० लाख रुपये, तर २०२५-२६ मध्ये ७४ हजार ४२७ कोटी ४१ लाख रुपये इतके होते. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प ८० हजार ९५२ कोटी रुपयांवर पोहचला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाच्या आकारमानात ८.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पामध्ये विकास कामांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात विकास कामांसाठी ४३ हजार १६२ कोटी २३ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. यावेळी ४८ हजार १६४ कोटी २८ लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

प्रमुख विकास कामांसाठी आर्थिक तरतूद (कोटीमध्ये)

विकास कामे  – अर्थसंकल्पीय तरतूद – रुपयातील हिस्सा

पाणीपुरवठा   –   ७,८०५     –  १६

रस्ते   –  ६,८७५   –  १४

सागरी किनारा मार्ग –  ५,६५०  – १२ (उत्तर वर्सोवा – दहिसर – दहिसर ते भाईंदर लिंकरोड)

मुंबई मलनि:स्सारण –  ५,६९० – १२

प्रकल्पगोरेगाव-मुलुंड लिंक रोड – २,६५०  – ०५

पूल – २,३००   – ०५

आरोग्य   – २,२१९ – ०५

पर्जन्य जलवाहिन्या – १,८००  – ०४

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड – २,६५०  – ०५