मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली असून विविध उपयोजना राबविण्यात येत आहेत. तसेच, आगामी वर्षातही उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये पालिकेने तब्बल १५९ कोटींची तरतूद केली आहे. चालू अर्थसंकल्पात केवळ ७६.१६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या या भरीव तरतुदीमुळे आगामी वर्षात महापालिका काय उपाययोजना करेल, याबाबत मुंबईकरांची उत्सुकता वाढली आहे.
महानगरपालिकेने १३ मार्च २०२२ रोजी मुंबई वातावरण कृती आराखडा प्रकाशित केला. मुंबईला २०५० सालापर्यंत नेट-झीरो आणि पर्यावरण-अनुकूल शहर बनविणे हा त्यामागील प्रमुख हेतू आहे. महानगरपालिकेकडून शाश्वत आणि समावेशक भविष्यासाठी वातावरणाच्या अनुषंगाने तातडीने कृती करण्याचे महत्त्व आराखड्यात अधोरेखित करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. शहरातील विकासकामे, खासगी वाहनांची वाढलेली संख्या, वातावरणीय बदल आदी विविध कारणांमुळे ते प्रदूषण नियंत्रणात आणण्यात पालिकेला पूर्णपणे यश मिळालेले नाही. वायू प्रदूषण नियंत्रणात आणून मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी, या हेतूने महानगरपालिका प्रशासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजात ७६.१६ कोटींची तरतूद केली होती. मात्र, आगामी वर्षात शुद्ध वातावरण व पर्यावरणाचा संकल्प सोडला असून तब्बल १५९.८२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
आगामी वर्षात ”मुंबई एअर नेटवर्क फॉर ॲडवान्स” या प्रकल्पाच्या माध्यमातून आयआयटी कानपूर यांच्यामार्फत संपूर्ण मुंबईत ७५ लो कॉस्ट सेन्सॉर्सचे नेटवर्क उभारून त्यांचे प्रचलन व परिरक्षण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी कार्यादेश देण्यात आले असून काम प्रगतीपथावर आहे. यामुळे विशेष यंत्रणेद्वारे महानगरपालिकेला वायू प्रदुषणाचे हॉटस्पॉट ओळखण्यास मदत होईल. आयआयटी कानपूर यांनी सादर केलेल्या मूल्यांकन अहवालामुळे वायू प्रदुषण कमी करण्यासाठी धोरण आखण्यास मदत होईस, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
”पर्यावरण संरक्षण”, ”ज्ञान व माहिती” आणि ”पर्यावरण व हवामान बदल” या तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून शहराच्या पर्यावरणीय आणि हवामान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. महानगरपालिका वायु प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकाम स्थळांवर २८ मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी, महानगरपालिकेच्या कामांसाठी विभाग स्तरावर पर्यावरण व्यवस्थापन योजना ( ईएमपी), मिस्टिंग, फॉगिंग मशीन, स्प्रिंकलर्स तैनात करणे आदी उपाययोजना करण्यात केल्या जात आहेत. महानगरपालिकेने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लिटर पिकर यंत्रासह आधुनिक विद्युत स्वीपर व यांत्रिकी पॉवर स्वीपर तैनात केले आहेत. तसेच, अधिक रहदारीच्या ठिकाणी पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याने प्रमुख रस्ते देखील धुतले जात आहेत.

