मुंबई : मुंबईमधील ५०० चौरस फुटांपेक्षा लहान घरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना मालमत्ता कर माफ करण्यात आल्यामुळे त्यांना पाणीपट्टी आणि मसनि:सारण आकार भरावा लागत नव्हता. मात्र जलमापकविरहित ५०० चौरस फुटांपेक्षा लहान घरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना भविष्यात पाणीपट्टी आणि मलनि:सारण भरावा लागण्याचे संकेत मुंबई महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फूट आणि त्याहून लहान क्षेत्रफळाच्या घरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेने ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा लहान घरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना मालमत्ता कर माफ केला होता. मालमत्ता कराच्या देयकामध्ये पाणीपट्टी आणि मलनि:सारण आकारासह अन्य करांचाही समावेश होता. त्यामुळे या रहिवाशांना पूर्ण करमाफी मिळाली होती.
मुंबई महानगरपालिकेने ५०० चौरस फूट व त्यापेक्षा लहान आकारमानाच्या जलमापकविरहित निवासी मालमत्तेला पाणीपट्टी आणि मलनि:सारण आकार लागू करण्याचे संकेत आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात दिले आहेत. भविष्यात ५०० चौरस फूट आणि त्याहून कमी क्षेत्रफळाच्या जलमाफक विरहित निवासी सदनिकांचा सरासरी दैनंदिन पाण्याच्या वापराबाबत सर्वेक्षण करून पाणीपट्टी व मलनि:सारण आकार लागू करण्याचे सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार आहे, असे आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे.
या निर्णयानुसार सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जलमापक विरहित सदनिकेत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पाणीपट्टी आणि जल आकार भरावा लागण्याची चिन्हे आहेत.

