मुंबई : पालिकेच्या विविध मोठमोठ्या प्रकल्पांची व विविध विकासकामांची देणी तब्बल २ लाख ४४ हजार कोटींच्या पुढे गेली आहेत. सागरी किनारा मार्गाचा उपनगरातील टप्पा, जलबोगद्यांची कामे, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे, पुलांची कामे अशा मोठमोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देखभालीच्या कामांची देणी यात समाविष्ट आहेत. त्यासाठी येत्या आर्थिक वर्षात ४१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या एकूण मुदतठेवी जानेवारी २०२६ अखेरीस ८१, ४४९ हजार कोटींपर्यंत असून मुदतठेवींच्या तिप्पट प्रकल्पाची देणी आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात पालिकेची आर्थिक स्थिती कशी असेल याचा अंदाज येईल.

मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. आधीच्याच प्रकल्पांची प्रचंड देणी पालिकेवर असून या कर्जाच्या ओझ्याखाली मुंबई महापालिका दबली असल्याचेच चित्र आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेने मूलभूत कतर्व्यांच्या पलिकडे पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यास सुरुवात केली. मात्र आता पायाभूत प्रकल्पांची संख्या आणि किंमती इतक्या वाढल्या आहेत की पालिकेच्या उत्पन्नाच्या पलिकडे या प्रकल्पांची देणी महापालिकेवर आहेत. त्यामुळे श्रीमंत महानगरपालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे. २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रकल्पांमुळे महापालिकेतील प्रकल्पांची देणी तब्बल १.९० लाख कोंटीवर गेली होती. तर हीच संख्या २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात वाढून २,३२,४१२ कोटींवर गेली आहेत. तर हे दायित्व आता २ लाख ४४ हजार कोटीवर गेले आहे.

पालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ८०, ९५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. भांडवली खर्चासाठी ४८, १६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र पालिकेचे उत्पन्न वाढलेले नसताना हा सगळा खर्च मुदतठेवी आणि राखीव निधी यातूनच केला जाणार आहे. पालिकेच्या मुदतठेवी ८१ हजार कोटीपर्यंत आहेत. त्यामुळे पालिकेने गेल्या काही वर्षांपासून राखीव निधी वापरण्यास सुरूवात केली असून चालू आर्थिक वर्षात १३, ७६५ हजार कोटी अंतर्गत कर्ज घेण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेकडे जकातीची नुकसान भरपाई, मालमत्ता कर आणि विकास नियोजन म्हणजेच पुनर्विकासातून मिळणारे उत्पन्न हे तीन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यामुळे ही भरमसाठ देणी येत्या काही वर्षात पूर्ण करणे पालिका प्रशासनाला मुश्किल होत जाणार आहे हे निश्चित आहे.

कोणत्या मोठ्या प्रकल्पांची किती देणी?

एकूण तब्बल ६३ मोठ्या प्रकल्पांची देणी महापालिकेला येत्या काही वर्षात द्यायची आहेत. ही देणी २ लाख ४४ हजार कोटी रुपये इतकी आहेत. त्यात रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, वर्सोवा दहिसर सागरी किनारा, दहिसर भाईंदर जोडरस्ता या कामांची देणी २ लाख १३ हजार कोटी आहेत. आरोग्य, घनकचरा, इमारत परिक्षण अशा पालिकेच्या विविध खात्यांच्या लहानमोठ्या कामांची ३१,४०६ हजार कोटीे रुपयांची देणी आहेत.