मुंबई : मुंबईतील तीव्र वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वाहतूक कोंडी कर लावावा या मागणीला मुंबई महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. विधानसभा अध्यक्षांचे बंधू आणि कुलाबामधील भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी ही मागणी केली होती. मात्र, असा कर लावण्याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. उलट महापौरांच्या आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या मागण्यांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे.
मुंबईत वाहतूक कोंडीमुळे अनेकांचे कित्येक तास प्रवासात जातात. त्यातही काही विशिष्ट परिसरात ही वाहतूक कोंडी अधिक असते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडी असलेले भाग ओळखून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी कर लागू करावा अशी मागणी मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या तोंडावर केली होती. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी ८ फेब्रुवारीला केली होती. उच्च वाहतूक असलेल्या भागांमध्ये एकट्या प्रवाशासह येणाऱ्या खासगी वाहनांवर हा कर लावावा व येत्या अर्थसंकल्पात तो लागू करावा. तसेच याबाबतचा पहिला प्रयोग दक्षिण मुंबईत करावा अशी मागणी त्यांनी केली होती. हा कर अनावश्यक वाहन वापराला आळा घालेल, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देईल आणि वाहतूक कोंडी तसेच वायू प्रदूषण कमी करेल, तसेच पालिकेचा महसूलही वाढेल, असेमकरंद नार्वेकर यांनी नमूद केले होते.
मुंबई लुटणाऱ्या ह्या प्रस्तावाशी भाजपा सहमत आहे का ? वाहतूक कोंडी कराची मागणी मकरंद नार्वेकर यांनी करताच आमदार आदित्य ठाकरे यांनी या मागणीला विरोध केला होता. मुंबई लुटणाऱ्या या प्रस्तावाशी भाजपा सहमत आहे का? असा जाहीर सवाल त्यांनी समाजमाध्यमांवरून केला होता. नार्वेकर यांनी अशी मागणी केल्यामुळे एका अर्थाने भाजपच अडचणीत आल्यासारखी स्थिती आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबत समाज माध्यमांवरून काही प्रश्न उपस्थित करत असा कर लावण्यास भाजपची सहमती आहे का असा सवाल करून भाजपला कोड्यात टाकले होते.
दरम्यान, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २५ एप्रिलला स्थायी समितीला सादर करण्यात आला. त्यात वाहतूक कोंडी कराचा उल्लेखही नाही. त्यावरून मकरंद नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत कुलाब्याचे महत्त्व मोठे असूनही, या भागासाठी अर्थसंकल्पात कोणतीही विशेष निधी तरतूद करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तसेच वाहतूक कोंडी कराबाबतही अर्थसंकल्पात मौन बाळगण्यात आले असल्याची प्रतिक्रिया नार्वेकर यांनी अर्थसंकल्पानंतर दिली.
शिवसेनेच्या सूचना
शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतील संगीत रस्ता, महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतील मुंबईच्या पाच प्रवेशमार्गांवर भव्य प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोरा उभारण्याच्या सूचनांचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.
