मुंबई : महापालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती वेळीच उपलब्ध न झाल्याने नागरिकांची बुधवारी प्रचंड गैरसोय झाली. मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठ्याच्या स्थितीची स्पष्टताच नसल्याने नागरिकांची दैनंदिन सर्व कामे रखडली. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी पाणी न आल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गुरुवार, शुक्रवारी हाती घेण्यात येणारी प्रस्तावित कामे लांबणीवर टाकण्यात आली असून महापालिकेने प्रस्तावित पाणीकपात रद्द केली आहे.
पडघा वीज उपकेंद्रातून पिसे व पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पाला केला जाणारा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मंगळवारी सायंकाळी ५:४५ ते ६:१५ या कालावधीत जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कार्यावर परिणाम झाला. परिणामी, पिसे व पांजरापूर येथून होणारा मुंबई १ व मुंबई २ टप्प्याचा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे एम. बी. आर. जलाशय पातळी पूर्ववत होईपर्यंत पाणीपुरवठ्यात रात्री ९ पर्यंत २० ते २५ टक्के कपात करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी रात्री उशिरा कळवले. वेळेत माहिती उपलब्ध न झाल्यामुळे नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा झाला नाही.
दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यास दोन तास लागणार असल्याचे पालिकेने रात्री उशिराच कळवले. शहर व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठ्यात २० ते २५ टक्के कपात, तसेच पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे पालिकेने स्पष्ट केले होते. पालिकेच्या माहितीनुसार बुधवारी पहाटेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. दरम्यान, दक्षिण मुंबईमधील काही भागात पहाटे पावणेपाचच्या सुमारास पाणीपुरवठा होतो. मात्र नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक रहिवासी हैराण झाले होते.
नेमके काय झाले त्याची माहिती नसल्यामुळे रहिवाशांची धावपळ उडाली. पहाटे साडेसहाच्या सुमारास कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, त्यामुळे रहिवाशांना पुरेसे पाणी मिळू शकले नाही. दरम्यान, महापालिकेने शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग एफ दक्षिण विभागात दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी १६ आणि १७ एप्रिल रोजी दक्षिण मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, मंगळवार आणि बुधवारी नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने हा निर्णय रद्द केला आणि प्रस्तावित काम पुढे ढकलले. मात्र, त्याची तारीख जाहीर केलेली नाही. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी केले जाणार होते.
