मुंबई : लोअर परळ येथील सेन्च्युरी मिलची जागा १३ हजार कोटी रुपयांची असून ती एका खासगी विकासकाला केवळ १,३०० कोटी रुपयांत ३० वर्षांच्या कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेचा आहे. हा प्रस्ताव लवकरच अंतिम मंजुरीसाठी पालिका सभागृहापुढे मांडला जाणार आहे. या प्रस्तावाला गिरणी कामगारांचा आणि गिरणी कामगार संघटनांचा विरोध आहे. ही जागा विकासकाच्या घशात घालण्याऐवजी सेन्च्युरी मिलची सर्वच्या सर्व ६.१७ एकर जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी द्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी आणि जागा विकासकाला देण्याचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगार एकजुटीकडून मंगळवारी सेन्च्युरी मिलच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले जाणार आहे.
गिरण्यांच्या जागेवरील काही भागावर गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे बांधून, सोडतीद्वारे या घरांचे वितरण पात्र कामगारांना केले जाते. आतापर्यंत १६ हजारांहून अधिक कामगारांना अशी घरे देण्यात आली आहेत. मात्र अजूनही एक लाखांहून अधिक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरांची प्रतीक्षा आहे. असे असताना आता मुंबईत गिरणी कामगारांच्या घरांसाठी गिरण्यांची जागाच शिल्लक नसल्याने एक लाखांहून अधिक गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्या गिरण्यांची जागा अद्याप गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध झालेली नाही, त्या गिरण्यांची जागा घरांसाठी द्यावी. तसेच उपलब्ध गिरण्यांचीही संपूर्ण जागा घरांसाठी द्यावी, अशी मागणी कामगार आणि संघटनांची आहे.
लोअर परळ येथील सेन्च्युरी मिलची ६.१७ एकर जागा एका खासगी विकासकाला ३० वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला नुकतीच सुधार समितीत मंजुरी मिळाली असून, लवकरच हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या सभागृहात ठेवला जाणार आहे. पालिकेच्या या प्रस्तावाला गिरणी कामगार एकजुटीचा विरोध आहे. गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागा शिल्लक नसताना उपलब्ध जागा विकासकांच्या घशात घालणे कामगारांसाठी अन्यायकारक आहे. मुळात सेन्च्युरी मिलची संपूर्ण ६.१७ एकर जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी द्यावी, अशी मागणी संघटनांची सुरुवातीपासून आहे.
ही मागणी मान्य न करता जागा कवडीमोल दरात विकासकाला देण्यात येत आहे. याला आमचा विरोध आहे. सेन्च्युरी मिलची संपूर्ण जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी द्यावी आणि विकासकाला जागा देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही गिरणी कामगार एकजुटीच्या माध्यमातून मंगळवारी दुपारी २ वाजता सेन्च्युरी मिलच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार असल्याची माहिती सर्व श्रमिक संघटनेचे नेते बी. के. आंब्रे यांनी दिली. या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
