मुंबई : मुंबईत अनेक प्रशासकीय विभागात दाटीवाटीची वस्ती, झोपडपट्टी असून त्या विभागात अधिक प्रमाणात कचरा संकलित होतो. त्यामुळे अशा विभागांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यावर भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून उपाययोजना करा. तसेच, ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो तेथे प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवून निगराणी करण्याचेही आदेश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. स्वच्छतेत नवनवे प्रयोग करण्यासाठी नागरिक संघ, सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्था, टीआयएसएससारख्या संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता चौक्यांना भिडे यांनी बुधवारी पहाटे आकस्मिक भेट दिली.
तसेच वडाळा परिसरातील सुका कचरा संकलन केंद्र आणि बरकत अली दर्गा मार्ग, अरुणकुमार वैद्य मार्ग येथे दुतर्फा सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली बेवारस वाहने व अस्वच्छतेबाबत स्वतंत्र मोहीम हाती घेऊन येत्या काही दिवसात हा मार्ग स्वच्छ करण्याचे आदेश भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी परिसरात पाहणी करताना त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. दररोज स्वच्छता वाहनांच्या किती फेऱ्या होतात, कचऱ्याचे वर्गीकरण-वहन कोणत्या पद्धतीने केले जाते, कोणत्या भागांत अधिक कचरा निर्माण होतो, अशा विषयांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
विविध संकुलांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्वतंत्र नियोजन करणे, कचरा वर्गीकरणाबाबत विशेषतः दाटवस्ती भागात व्यापक जनजागृती करणे, तसेच ‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्वच्छता अभियान अधिक परिणामकारकपणे राबविण्यावर भर देण्याच्या सूचना भिडे यांनी केल्या. नागरी सहभागातून घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते. कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन व्यवस्थेसाठी नव्या संकल्पनांना वाव द्या. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी सातत्याने संवाद साधा. त्यांना या अभियानाचा सक्रिय भाग बनवा.
प्रमुख महाविद्यालयील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासीता उपक्रम राबवून त्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घ्या. स्वयंसेवी संस्थांना सोबत घेवून दाटवस्तींमध्ये सुरू असलेले स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अधिक सक्षम करण्यावर भर देण्याच्या सूचना भिडे यांनी केल्या. त्यावेळी उप आयुक्त प्रशांत सपकाळे, उप आयुक्त प्रशांत गायकवाड, उप आयुक्त किरण दिघावकर, उप आयुक्त संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त अरुण क्षीरसागर, सहायक आयुक्त शंकर भोसले, सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बेवारस वाहने हटवा
मुंबईतील बस थांब्यांवर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे हा परिसर अधिक स्वच्छ ठेवावा. तसेच प्रमुख रस्त्यांवरील स्वच्छता वाढविण्यासाठी लक्ष देण्यात यावे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली बेवारस वाहने हटविण्यात यावीत. तसेच राडारोडा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरिवाल्यांवरही कारवाई करण्याचे आदेश भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
