मुंबई : शहर आणि उपनगरात रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांबद्दल उच्च न्यायालायाने शुक्रवारी चिंता व्यक्त करून मुंबई महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे.

दृश्यमान स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईतील सर्व नगरसेवकांना स्वतंत्रपणे पत्र पाठवून आपल्या प्रभागात नागरिकांचा सहभाग वाढविणे, स्वच्छता मोहिमेला सक्रिय सहकार्य करणे आणि वारंवार कचरा टाकण्याची ठिकाणे कायमस्वरूपी हटविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

कांजूरमार्ग कचराभूमीवरील दुर्गंधीसंदर्भातील याचिकांवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालायाने मुंबईतील कचरा व्यवस्थापनातील त्रुटींबाबतही चिंता व्यक्त केली. तसेच मुंबई महापालिकेला वारंवार फटकारले. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी या आठवड्यात दोनदा घनकचरा व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली. शनिवारच्या बैठकीत त्यांनी स्वच्छतेशीसंबंधित विविध विषयांवर निर्देश दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबईत दृश्यमान स्वच्छतेसाठी आणि वारंवार कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांच्या निर्मूलनासाठी महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. वारंवार जिथे कचरा टाकला जातो अशी ठिकाणे कायमस्वरूपी हटविण्यासाठी व्यापक कृती आराखडा राबविण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे.

आश्विनी भिडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन उपविधींची कठोर अंमलबजावणी, नियमित क्षेत्रीय पाहणी, तंत्रज्ञानाधारित निरीक्षण आणि जनसहभाग वाढविण्याबाबत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्तांनी मुंबईतील सर्व २२७ नगरसेवकांना स्वतंत्रपणे पत्र पाठवून शहरव्यापी स्वच्छता मोहिमेस सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हटले आहे पत्रात…

मुंबई शहराची स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी मुंबई घडविण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील असली तरी या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींचे नेतृत्व आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला जे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने महानगरपालिकेने शहरभर उघड्यावर कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणांचा शोध व त्यांच्या कारणांचे विश्लेषण, तसेच त्यांचे कायमस्वरूपी समूळ उच्चाटन करण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण, घनकचरा व्यवस्थापन कठोर अंमलबजावणी, तसेच वेळप्रसंग अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि नागरिकांच्या सहभागाद्वारे कचऱ्याच्या पुनरावृत्तीला कायमस्वरूपी आळा घालण्याचे अभियान सुरू केले आहे. मात्र, लोकसहभागाशिवाय आणि लोकप्रतिनिधींच्या सक्रिय नेतृत्वाशिवाय स्वच्छतेची चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या प्रभागात नियमित स्वच्छता अभियानांचे आयोजन व नेतृत्व करावे. प्रभागातील कचरा टाकण्याची ठिकाणे ओळखून ती कायमस्वरूपी हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवकांना करण्यात आले आहे.