मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रक महापालिका चिटणीस विभागाने नुकतेच जाहीर केले असून वैधानिक समित्यांच्या निवडणुका २० आणि २३ फेब्रुवारी रोजी, तर विशेष समित्यांच्या निवडणुका ५, ६ आणि ९ मार्च रोजी घेण्यात येणार आहेत. या वेळापत्रकानुसार शिक्षण समिती आणि स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक २० फेब्रुवारी रोजी, तर सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षांपदासाठी २३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाचा नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख अनुक्रमे १८ फेब्रुवारी आणि १० मार्च आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेत वैधानिक समित्यांच्या निवणुकीची धामधून सुरू होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी, तर मतमोजणी अंती १६ जानेवारी निकाल जाहीर करण्यात आला. निवडणुकीत भाजपचे ८९, शिवसेनेचे (शिंदे) २९, शिवसेनेचे (ठाकरे) ६५, काँग्रेसचे २४, एमआयएमचे ८, मनसेचे ६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३, समाजवादी पार्टीचे २, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला. मुंबईच्या महापौरांची निवडणुकही नुकतीच पार पडली. भाजप – शिवसेना (शिंदे) महायुतीने महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांना उमेदवारी दिली. मात्र विरोधकांनी उमेदवारच न दिल्यामुळे रितू तावडे बिनविरोध विजयी झाल्या. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या चिटणीस विभागाने वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. त्यानुसार चार वैधानिक समित्यांपैकी शिक्षण समिती आणि स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक २० फेब्रुवारी रोजी अनुक्रमे सकाळी ११ आणि दुपारी २ वाजता होणार आहे. तसेच सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी २३ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे सकाळी ११ व दुपारी २ वाजता निवडणूक होणार आहे. या चारही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज १८ फेब्रुवारी रोजी सादर करावा लागणार आहे.
स्थापत्य समिती (शहर), स्थापत्या समिती (उपनगर), सार्वजनिक आरोग्य समिती, बाजार व उद्यान समिती, विधि समिती, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांच्या निवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. स्थापत्य समिती (शहर), स्थापत्या समिती (उपनगर) अध्यक्षांची निवडणूक १२ मार्च रोजी, सार्वजनिक आरोग्य समिती, बाजार व उद्यान समिती अध्यक्षांची निवडणूक १३ मार्च रोजी, तर विधि समिती आणि महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची निवडणूक १६ मार्च रोजी होणार आहे. या विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज १० मार्चपर्यंत सादर करावे लागणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांतील छोट्या-मोठ्या कामांना विभाग स्तरावरील प्रभाग समित्यांमध्ये मंजुरी दिली जाते. एकूण १७ प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडणुका अनुक्रमे ५, ६ आणि ९ मार्च रोजी होणार आहेत.
